Defunct Satellite : पृथ्वीवर कोसळणार निकामी उपग्रह | पुढारी

Defunct Satellite : पृथ्वीवर कोसळणार निकामी उपग्रह

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या ‘नासा’चे एक निवृत्त सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह ‘रियूवेन रॅमाटी हाय एनर्जी सोलर स्पेक्ट्रोस्कोपिक इमेजर’ (आरएचईएसएसआय) या महिन्यात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अर्थातच त्याच्यापासून पृथ्वीवासीयांना कोणताही धोका नाही. लाँचिंगनंतर आता 21 वर्षांनी हे सॅटेलाईट पृथ्वीवर कोसळणार आहे. तत्पूर्वी पृथ्वीच्या वातावरणात शिरताच त्याचे जळून अनेक तुकडे होतील.

हे सॅटेलाईट 2002 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्याने आपल्या लो-अर्थ कक्षेतून म्हणजेच पृथ्वीच्या जवळच्या कक्षेतून सौर ज्वाळा आणि सूर्याच्या कोरोनल मास इजेक्शनचे निरीक्षण केले होते. ऊर्जेचे असे शक्तिशाली स्फोट कसे होतात याची माहिती समजून घेण्यासाठी संशोधकांना यामुळे मदत मिळाली होती. या उपग्रहाची निगराणी अमेरिकेचा संरक्षण विभाग करीत आहे.

या विभागाने सांगितले की 660 पौंडाचे हे सॅटेलाईट बुधवारी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकेल. वातावरणात येताच त्याचे जळून अनेक तुकडे होतील व ते विखरून खाली पडतील. यामुळे पृथ्वीवर नुकसान होण्याची शक्यता नाही. या उपग्रहात ‘इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर’ हे महत्त्वाचे उपकरण होते. त्याच्या सहाय्याने सूर्याची एक्स-रे आणि गामा किरणे नोंदवली गेली.

Back to top button