सूर्यावर बनली एक लाख किमी उंच प्लाझ्माची भिंत | पुढारी

सूर्यावर बनली एक लाख किमी उंच प्लाझ्माची भिंत

वॉशिंग्टन, पुढारी वृत्तसेवा : सध्या उत्तर गोलार्धावर आग ओगत असलेल्या सूर्यावर सातत्याने हालचाली होत असतात. याचाच एक भाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरून नुकताच विशालकाय प्लाझ्मा बाहेर पडला. तो एखाद्या मोठ्या धबधब्यासारखा दिसत होता. खगोलशास्त्रज्ञ एडुआर्डो शाबर्गर पोपेऊ यांनी गेल्या 9 मार्च रोजी या महाकाय प्लाझ्माला कॅमेराबद्ध केले. यामध्ये सूर्यावर प्लाझ्माची विशालकाय भिंत दिसून येत आहे. ही भिंत सूर्याच्या पृष्ठभागापासून एक लाख किमी इतकी उंच होती.

प्लाझ्माचा हा फवारा सुमारे एक लाख किमी उंचावर पोहोचल्यानंतर पुन्हा सूर्याच्या पृष्ठभागावर पडला. खगोलशास्त्रज्ञ पोपेऊ यांनी सांगितले की, हा प्लाझ्मा प्रचंड उंचीवर पोहोचल्यानंतर ताशी सुमारे 36 हजार किमी वेगाने कोसळला. तो पृथ्वीच्या ध्रुवीय भागातील अरोरासारखा दिसत होता. या अरोराला ध्रुवीय मुकूट असेही म्हटले जाते.

सूर्यावरील प्लाझ्मा हा अत्यंत उष्ण असतो. ज्यावेळी तो प्रचंड उंचीवर पोहोचतो, तेव्हा सूर्याच्या धु्रवीय भागातील मजबूत चुंबकीय शक्तीमुळे तो प्रचंड वेगाने पुन्हा सूर्यावरच कोसळतो. खगोल शास्त्रज्ञांच्या मते, सूर्यावरील हालचाली सध्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. याचे कारण म्हणजे सूर्यावर एक सौरचक्र सुरू आहे. यामुळेच तप्त गोळ्यावरील हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक दशकात सूर्यावरील चुंबकीय ध्रुव आपले ठिकाण बदलत असतात. यामुळे तेथील सनस्पॉटही घटतात. प्रत्येक सौरचक्रात सूर्याचे चुंबय क्षेत्र अपेक्षाकृत शांत आणि सनस्पॉटची संख्याही कमी असते. मात्र, हे चक्र जसजसे पुढे जाते, तसे चुंबकीय क्षेत्र जटिल होत जाते. तसेच हालचालही वाढते.

Back to top button