गाडीच्या नंबर प्लेटसाठी खर्च केले 122 कोटी रुपये; ‘या’ महागड्या नंबरची गिनिज बुक मध्येही नाेंद | पुढारी

गाडीच्या नंबर प्लेटसाठी खर्च केले 122 कोटी रुपये; 'या' महागड्या नंबरची गिनिज बुक मध्येही नाेंद

दुबई : गाडी खरेदी केल्यानंतर त्यासाठी एक विशिष्ट क्रमांक जारी केला जातो आणि या क्रमांकाद्वारे त्याची ओळख पटवली जाते. या नंबरसाठी खरेदीदारालाही काही रुपये मोजावे लागतात. कधी कधी तर लोक आपल्या पसंतीचा नंबर मिळवण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करतात. अशाच एका पठ्ठ्याने कारच्या नंबर प्लेटच्या नादात 122 कोटी रुपये खर्च केले आहेत. सर्वात महागड्या नंबर प्लेटच्या लिलावात त्याने हा नंबर मिळवला आहे. त्या व्यक्तीने सर्वात महागड्या पी 7 नंबर प्लेटसाठी 55 दशलक्ष दिरहम खर्च केले आहेत. या लिलावादरम्यान इतर अनेक क्रमांकांचाही लिलाव करण्यात आला होता; पण पी 7 हा सर्वात महागडा क्रमांक ठरला आहे. या सर्वात महागड्या नंबर प्लेटने गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.

या लिलावाचे आयोजन दुबई रोड अँड ट्रान्स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी आणि टेलिकम्युनिकेशन कंपनी एतिसलात आणि डू यांनी हा केले होते. दुबईतील जुमेराह येथील फोर सीझन्स हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारच्या नंबर प्लेटस्शिवाय मोबाईल फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला. यामध्ये फक्त पी 7 च नाही तर लिलाव झालेल्या सर्व नंबरप्लेटवर मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली होती आणि लोकांनी त्यांच्या आवडत्या नंबर प्लेटसाठी भरपूर पैसे  खर्च केले.

या लिलावात नंबर प्लेटसाठी 15 दशलक्ष दिरहमने बोलीची सुरुवात झाली. मात्र, काही सेकंदातच ती 30 दशलक्ष दिरहमच्या पुढे गेली. यानंतर बोली 5.5 कोटी दिरहमपर्यंत पोहोचली. ही बोली पॅनेल सातच्या व्यक्तीने लावली होती ज्यानंतर या क्रमांकाचे नाव पी 7 असे ठेवण्यात आले. या लिलावात पी 7 हा खरेदी केलेला सर्वात महाग क्रमांक आहे; पण पी 7 पेक्षा एफ 1 हा आतापर्यंतचा सर्वात महागडा क्रमांक आहे. एफ 1 हा क्रमांक सुमारे 137 कोटी रुपयांना विकला गेला आहे; पण तो कोणत्याही लिलावात विकला गेला नाही. त्यामुळे पी 7 हा सार्वजनिक लिलावात विकला गेलेला सर्वात महाग क्रमांक ठरला आहे.

Back to top button