दिवसातून तीनवेळा ब्रश केल्याने होतात ‘हे’ फायदे | पुढारी

दिवसातून तीनवेळा ब्रश केल्याने होतात 'हे' फायदे

नवी दिल्ली : मधुमेह हा एक असा आजार आहे की, त्याची एकदा बाधा झाली की, संबंधित रुग्ण यातून पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र, योग्य आहाराच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते. अशा या मधुमेहाबाबत नुकतेच जे संशोधन समोर आले आहे ते चकित करणारेच आहे. या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, जे लोक दिवसातून तीनवेळा ब्रश करतात त्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी असतो. दुसरीकडे, ज्या लोकांना दातांच्या समस्या आहेत त्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डरचा (चयापचय विकार) धोका असतो.

दातांच्या समस्या आणि मधुमेह यांचा काय संबंध आहे, यावर अजूनही संशोधन करण्याची गरज आहे. मात्र, नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार, दातासंबंधीचे विकार हे तोंडाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करतात. हिरड्यांशी संबंधित रोगाला पीरियडॉन्टायटिसदेखील म्हणतात. हा रोग हिरड्या आणि हाडांच्या जीवाणू संसर्गामुळे होतो. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास दातांच्या समस्या वाढू शकतात. हिरड्यांचा आजार असलेल्या लोकांच्या रक्तामध्ये इन्फ्लामेंटरी मार्करचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. यातून मधूमेहाचा धोकाही बळावतो. मात्र, सातत्याने ब्रश केल्याने दात, हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि मधुमेहाचा धोका घटण्यास मदत मिळते.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, तोंडाच्या समस्यांमुळे मधुमेह होऊ शकतो का, हे जाणून घेण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. तथापि, काही संशोधनांत अशी माहिती देण्यात आली आहे की, हिरड्यांचे आजार असलेल्या लोकांना मधुमेहाचा धोका जास्त असतो; पण यासोबतच संशोधनात असेही समोर आले आहे की, मधुमेह असलेल्या लोकांना दातांच्या समस्या होण्याचा धोका असतो. मधुमेहामुळे तोंडातील लाळ ग्रंथींवर परिणाम होतो. परिणामी, लाळ कमी होते. हा असा पदार्थ आहे, जो दात किडण्यास प्रतिबंध करतो आणि बॅक्टेरियाची वाढ रोखतो. लाळेमध्ये उच्च ग्लुकोज पातळी व्यतिरिक्त दातांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होतो. यामुळे दाताची स्वच्छता महत्वाची ठरते.

Back to top button