वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने आपल्या नव्या चांद्रमोहिमेची घोषणा केली आहे. तब्बल 50 वर्षांनंतर 'नासा' पुन्हा एकदा आपल्या अंतराळवीरांना चंद्राकडे पाठवणार आहे. त्यासाठी चार अंतराळवीरांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रथमच एका महिलेचा आणि कृष्णवर्णीय अंतराळवीराचाही समावेश आहे जे चंद्रावर जातील. क्रिस्टिना कोच या चंद्रावर जाणार्या पहिल्या महिला तसेच व्हिक्टर ग्लोवर हे चंद्रावर जाणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरतील. त्यांच्यासमवेत रीड विस्मॅन आणि जेरेमी हॅनसेन असणार आहेत. 'नासा'ची ही मोहीम 2024 च्या अखेरीस किंवा 2025 च्या सुरुवातीस सुरू होईल.
हे चार अंतराळवीर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार नाहीत, पण चंद्राभोवती प्रदक्षिणा घालतील. ते आगामी चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांसाठी लँडिंगचा मार्ग खुला करतील. टेक्सासच्या ह्युस्टनमधील एका कार्यक्रमात 'नासा'ने आपल्या या चारही चांद्रवीरांना सादर केले. त्यापैकी तीन अंतराळवीर अमेरिकन नागरिक असून एक कॅनडाचा आहे. या मोहिमेसाठी चारही अंतराळवीर कठोर प्रशिक्षण घेतील.
आपल्या मोहिमांमध्ये अधिक विविधता आणण्याच्या आपल्या वचनानुसार 'नासा'ने एक महिला आणि कृष्णवर्णीय अंतराळवीराची निवड केली आहे. चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरणार्या क्रिस्टिना कोच 44 वर्षांच्या असून एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्या आतापर्यंत 328 दिवस अंतराळात राहिलेल्या आहेत. तसेच 'सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी महिला' असा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 'नासा'च्या अन्य एक महिला अंतराळवीर जेसिका मीर यांच्यासमवेत त्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये केवळ महिलांनी केलेल्या स्पेसवॉकमध्ये सहभाग घेतला होता. 47 वर्षांचे जेरेमी हॅन्सन हे कॅनडाचे रहिवासी आहेत. कॅनेडियन स्पेस एजन्सीमध्ये सहभागी होण्यापूर्वी ते रॉयल कॅनेडियन एअरफोर्समध्ये एक फायटर पायलट होते. ही त्यांची पहिलीच अंतराळ मोहीम आहे.
'नासा'च्या या मोहिमेत 47 वर्षांचे रीड वाईसमॅन हेही आहेत. ते अमेरिकेच्या नौदलातील पायलट आहेत. काही काळ त्यांनी 'नासा'च्या अंतराळवीर कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. 2015 मध्ये ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊन आले आहेत. 46 वर्षांचे व्हिक्टर ग्लोबर हेही अमेरिकेच्या नौदलात असून ते एक प्रशिक्षणार्थी पायलट आहेत. ते 2013 मध्ये 'नासा'त सहभागी झाले आणि 2020 मध्ये त्यांनी पहिला अंतराळ प्रवास केला. सहा महिने अंतराळ स्थानकावर राहणारे ते पहिलेच आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती होते.