अवघ्या तीस सेकंदांत ‘दूध का दूध, पानी का पानी’! | पुढारी

अवघ्या तीस सेकंदांत ‘दूध का दूध, पानी का पानी’!

चेन्नई : दुधात पाणी मिसळून विकणारे अनेक महाभाग असतात आणि ग्राहकांचे पैसे अक्षरशः ‘पाण्यात’ जातात! मात्र ही भेसळ ओळखणे सोपे काम नसते. आता भारतीय संशोधकांनी यासाठी एक प्रभावी उपकरण बनवले आहे. हे उपकरण खर्‍या अर्थाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ ही म्हण सार्थ करू शकते! -डी पेपरचा वापर करून बनवलेले हे एक पोर्टेबल उपकरण आहे. ते केवळ तीस सेकंदांमध्येच दूधामधील भेसळ दाखवून देते.

आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे. त्याच्या मदतीने अगदी घरातही दुधातील भेसळ ओळखता येऊ शकते. हे उपकरण युरिया, डिटर्जंट, साबण, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साईड, सोडियम-हायड्रोजन-कार्बोनेट आणि मिठासह भेसळीसाठी सर्वसाधारणपणे वापरणार्‍या सर्व पदार्थांचा छडा लावू शकते.

दूधाची शुध्दता तपासण्यासाठी पारंपरिक प्रयोगशाळा आधारित पद्धती महागड्या आणि वेळखाऊ आहेत. त्याच्या तुलनेत ही नवी पद्धत किफायतशीर आहे. केवळ दुधासाठीच नव्हे तर पाणी, ताजा रस आणि मिल्कशेकसारख्या अन्य पेयपदार्थांच्या चाचणीसाठीही हे उपकरण वापरले जाऊ शकते. त्यासाठी अशा पदार्थांचा केवळ एक मिलीमीटरचा नमुनाही पुरेसा ठरतो.

आयआयटी मद्रासच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. पल्लव सिन्हा महापात्रा यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन केले आहे. ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या नियतकालिकात त्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. डॉ. महापात्रा यांनी सांगितले की थ्री-डी पेपर आधारित मायक्रोफ्लुइडिक उपकरणाची संरचना सँडविचसारखी आहे. तिच्या वरील आणि खालील आवरणामध्ये एक मध्यवर्ती स्तर असतो. त्यामधून तरल पदार्थ समान गतीने प्रवाहित होऊ शकतात. या उपकरणाच्या सहाय्याने अशा तरल पदार्थांमधील भेसळीचा छडा लावण्यात येतो.

Back to top button