जगातील सर्वात वृद्ध उंदीर“ | पुढारी

जगातील सर्वात वृद्ध उंदीर``

न्यूयॉर्क : उंदरांचे सरासरी वय दोन वर्षांपेक्षाही कमी असते. मात्र, एका उंदराने दीर्घायुषी होण्याचा विश्वविक्रमच केला आहे. त्याने 9 फेब्रुवारी 2023 या दिवशी वयाची 9 वर्षे 210 दिवस पूर्ण केली आहेत. या उंदराचे नाव आहे पॅट्रिक स्टीवर्ट. त्याला प्रेमाने ‘पॅट’ असे म्हटले जाते. त्याच्याइतके आजपर्यंत कुठलाही उंदीर जगलेला नाही. पॅट्रिकच्या आधी दीर्घायुषी होण्याचा विक्रम फ्रिट्जी या उंदराच्या नावावर होता. तो 1977 ते 1985 पर्यंत जगला. सात वर्षे 225 दिवसांचे आयुष्य भोगून हा उंदीर मृत्युमुखी पडला. ब्रिटनच्या ब्रिजेट बियर्ड यांच्याकडे हा उंदीर होता.

9 वर्षे 210 दिवसांपेक्षाही अधिक काळ जगलेला पॅट्रिक हा पॅसिफिक पॉकेट माऊस आहे. उत्तर अमेरिकेतील ही उंदरांची सर्वात छोट्या आकाराची प्रजाती आहे. एके काळी तर ही प्रजाती लुप्त झाली असल्याचे मानले जात होते. मात्र, 1993 मध्ये त्यांच्या छोट्याशा समूहाला शोधण्यात आले. आता पॅट्रिकचे नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. या प्रजातीचे सरासरी वय एक ते दोन वर्षे असते.

पिंजर्‍यात राहणारे व पाळलेले उंदीर जास्तीत जास्त चार ते सहा वर्षे जगतात. मात्र, पॅट्रिकने याबाबत विक्रम केलेला आहे. त्याचा जन्म कॅलिफोर्नियाच्या सॅन दियागो प्राणीसंग्रहालयात 12 जुलै 2013 मध्ये झाला आणि सध्याही तो तिथेच आहे. प्रसिध्द अभिनेता पॅट्रिक स्टीवर्टचे नाव त्याला देण्यात आले आहे.

Back to top button