गुरू आणि युरेनसवरील हवामान बदलतेय… | पुढारी

गुरू आणि युरेनसवरील हवामान बदलतेय...

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या हबल दुर्बिणीने गुरू आणि युरेनस या ग्रहांची काही छायाचित्रे टिपली आहेत. 2014 ते 2022 या काळात टिपलेल्या या छायाचित्रांवरून असे दिसून येते की या दोन्ही ग्रहांवरील हवामान हळूहळू बदलत चालले आहे. या छायाचित्रांच्या मदतीने या ग्रहांवर काळानुसार बदलत चाललेल्या हवामानाबाबत अनेक प्रकारची माहिती गोळा करण्यात आली आहे.

गुरू हा ग्रह सूर्यापासून सुमारे 779 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. तसेच युरेनस ग्रहाचे अंतर तीन अब्ज किलोमीटर आहे. ‘नासा’च्या संशोधकांच्या मते, ही सर्व छायाचित्रे भविष्यात बरीच सहायक ठरू शकतात. दोन्ही ग्रह अतिशय धीम्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्याचा अर्थ असाही आहे की या दोन्ही ग्रहांवरील हवामानही बर्‍याच काळानंतर बदलत असते. मात्र, आता या दोन्ही ग्रहांवरील बदल पाहिले जात आहेत. या दोन्ही ग्रहांवर वायूंचे भांडारच आहे. युरेनसबाबत तर ही बाब अधिक प्रकर्षाने दिसून येत आहे. त्याच्या विचित्र पद्धतीने झुकलेल्या अक्षामुळे एक गोलार्ध सुमारे 42 वर्षांपर्यंत पूर्णपणे सावलीतच असतो, तिथे सूर्यप्रकाश पोहोचतच नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये हबल या अंतराळ दुर्बिणीने युरेनसचे एक छायाचित्र पाठवले होते.

या ग्रहाच्या उत्तर ध्रुवावर एक मोठे सफेद रंगाचे वर्तुळ दिसून येते. रासायनिक धुक्यामुळे असे घडत असते. या वर्तुळाच्या काठावर अनेक वादळांबरोबर निर्माण होणारे धुके अगदी पृथ्वीवरील स्मॉगसारखेच दिसते. हबल दुर्बिणीच्या पहिल्या छायाचित्रांपैकी एक असलेल्या नोव्हेंबर 2014 च्या प्रतिमेत युरेनस ग्रह अतिशय चमकदार दिसून येतो. टीमच्या म्हणण्यानुसार दरवर्षी या धुक्यात वाढ होते. यावर्षी जानेवारीत गुरू ग्रहाचे एक छायाचित्र समोर आले होते. त्यामध्ये त्यावरील लाल रंगाचा डाग विशेषत्वाने दिसून आला. हा डाग म्हणजे गुरूवरील अनेक वर्षांपासून सुरू असलेले मोठे वादळ आहे. या वादळातही वाढ झालेली दिसून आली आहे.

Back to top button