मोबाईलच्या अतिवापराने मिरगीचा वाढतो धोका | पुढारी

मोबाईलच्या अतिवापराने मिरगीचा वाढतो धोका

अलिगड : सध्या मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजच्या डिजिटल जगात इलेक्ट्रॉनिक गॅझेटसमुळे मानवी जीवन अधिक सुलभ बनले आहे. मात्र, या गॅझेटचा अतिवापर हे अनेक समस्यांचे कारण बनू लागले आहे. यामुळे त्यांचा मर्यादित वापर करणे आता महत्त्वाचे बनत आहे.

विशेषज्ञांच्या मते, मोबाईलचा अतिवापर केल्याने आपल्या शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर ही बाब गंभीरपणे घेतली नाही तर आपले भविष्य अत्यंत वेदनादायी ठरू शकते. यामुळे आताच सतर्क होणे, अत्यंत महत्त्वाचे ठरते. मोबाईल फोनमधून बाहेर पडणारी किरणे वापरकर्त्याच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे मिरगीचे (अपस्मार) झटके येऊ शकतात.

अलिगडमधील बाल रोग विशेषज्ञ डॉ. आलोक कुलश्रेष्ठ यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, भारतात सध्या एक हजार लोकांमागे सहा लोकांमध्ये अपस्माराची लक्षणे दिसून येत आहेत. याशिवाय मुलांमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय मोबाईलचा अतिवापर केल्याने मुलांनाही अपस्माराच्या झटक्याची शक्यता वाढते.

मोबाईलचा स्क्रीन प्रमाणापेक्षा जास्तवेळ पाहणे आणि यामुळे झोप पुरेशी न होणे, अशा कारणामुळे अपस्माराचे प्रमाण वाढू लागले आहे. या आजारावर उपचार शक्य आहे. मात्र, यासाठी किमान तीन वर्षे औषधांचे सेवन करावे लागते. या आजाराचे आणखी एक कारण म्हणजे तणाव आहे. सध्या हा आजार 12 ते 18 वर्षे वयोगटात दिसून येत आहे. यावरच वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

Back to top button