गायीच्या शेणापासून झाडाच्या रोगावरही प्रभावी उपचार | पुढारी

गायीच्या शेणापासून झाडाच्या रोगावरही प्रभावी उपचार

नवी दिल्ली : प्राचीन भारतीय संस्कृती आणि निसर्ग यामधून अनेक गोष्टी शिकून घेत भारतातील एका कृषिशास्त्रज्ञाने मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे. आयसीएआर-सीआयएसएचचे संचालक म्हणून काम केलेल्या या कृषिशास्त्रज्ञाचे नाव आहे डॉ. राम कृपाल पाठक. आवळ्याच्या एका विशिष्ट प्रकाराचे ते जनकही आहेत. या प्रजातीला ‘नरेंद्र आवळा वनस्पती’ असे नाव आहे. देशातील आवळ्याच्या सर्वात प्रचलित प्रजातींपैकी ही एक बनलेली आहे. त्यांनी बेलाचीही अशी प्रजाती बनवली आहे, जिच्यामध्ये एक एक किलोचे फळ असते. आंब्यावरील एका रोगावरही त्यांनी उपाय शोधला होता. हा उपाय होता गायीच्या शेणाचा!

डॉ. राम कृपाल पाठक हे प्राचीन ऋषी-मुनींनी सांगितलेल्या पद्धतींवर आणि अगदी अग्निहोत्रासारख्या होमहवनाकडे वैज्ञानिक द़ृष्टीकोनातून पाहतात. ते ‘होमा फार्मिंग’चे तज्ज्ञ आहेत. आंब्याच्या झाडावर पडणारा एक रोग म्हणजे ‘गमोसिस.’ त्याच्यावर इलाज करणे हे अतिशय कठीण काम होते. आंब्याचे झाड जिथून कापले जाते तिथून गम बाहेर येतो. त्याला जीवाणू आणि बुरशीचे लवकर संक्रमण होते व त्यामुळे संपूर्ण झाड वठून जाते. वैज्ञानिकांनी त्यावर केमिकल (रासायनिक) फॉर्म्युलेशन बनवले होते. मात्र ते फारसे परिणामकारक ठरले नाही. डॉ. पाठक यांनी त्यावर पारंपरिक पद्धतींमधून उपाय शोधला.

पूर्वी यावर गायीच्या शेणाचा उपाय केला जात असे, हे त्यांना समजले. त्यांनीही त्याचा वापर केला आणि परिणाम अभूतपूर्व होता. गायीच्या शेणात अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे पूर्वी घरेही गायीच्या शेणाने सारवली जात असत. ज्यावेळी गायीचे शेण आंब्याच्या झाडावर वापरले गेले त्यावेळी त्याच्या बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनची वाढ रोखली गेली. याबाबतच्या संशोधनाचा शोधनिबंधही नंतर प्रसिद्ध करण्यात आला. हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष असलेले डॉ. पाठक आता 80 वर्षांचे झाले आहेत. मात्र आजही ते आपल्या क्षेत्रात सक्रिय आहेत.

Back to top button