‘या’ गावात नाहीत रस्ते! | पुढारी

‘या’ गावात नाहीत रस्ते!

अ‍ॅम्स्टरडॅम : इटलीतील व्हेनिसला आपण ‘कालव्यांचे शहर’ म्हणून ओळखतो, पण असे कालवे असणारी अन्यही काही ठिकाणे आहेत. त्यापैकी एक गाव नेदरलँडमध्ये आहे. या गावात रस्तेच नाहीत, तर गल्लीबोळांतून केवळ कालवेच आहेत आणि इथे नावेतूनच इकडेतिकडे जावे लागते!

या गावात कार, बाईक यांसारखी वाहनेही नाहीत. या गावात राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बोटीचा वापर करतात. नदीकाठी असलेले हे गाव आकाराने लहान असले तरी टुमदार आहे. इथले प्रदूषणमुक्त नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून लोक भेटी देतात. या गावातली सुंदर घरे आणि नदीतले स्वच्छ पाणी पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आज या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपण नेदरलँडमधील गिथूर्न या छोट्याशा गावाबद्दल बोलत आहोत. हे गाव इतके रमणीय आहे की, ते बघून कुणालाही त्याची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. या गावात एकही रस्ता नाही. त्यामुळे याला नेदरलँड्सचे व्हेनिस असेही म्हटले जाते.

गावात रस्ते नाहीत, त्यामुळे लोक कार किंवा बाईक खरेदी करत नाहीत. इथे फक्त बोटींचा वापर केला जातो. कार व अन्य वाहने नसल्याने गावात प्रदूषण अजिबात दिसत नाही. इथे अनेक लाकडी पूलही बांधण्यात आले आहेत. या गावात एकूण 180 पूल आहेत, तसच या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे तीन हजारच्या जवळपास आहे. इथे प्रत्येक कुटुंबाची स्वतःची बोट आहे. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ पडतो, त्यामुळे इथे आईस स्केटिंगचा आनंदही लुटता येतो.

Back to top button