water crisis : महासागरांमुळे दूर होईल जलसंकट? | पुढारी

water crisis : महासागरांमुळे दूर होईल जलसंकट?

वॉशिंग्टन : पिण्याच्या पाण्याची समस्या जगात अनेक देशांमध्ये आहे. कमी पर्जन्यमान, गोड्या पाण्याचे मर्यादित साठे यामुळे जगभरात जलसंकट आहे. ते दूर करण्यासाठी महासागरांची मदत काही प्रमाणात घेतली जात असते. समुद्राचे पाणी खारट असते, म्हणजेच त्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. या पाण्यातून मीठ वेगळे करून ते पिण्यासाठी वापरले जाते. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे हानीकारक ठरते.

जलसंकटावर मात करण्यासाठी ‘क्लाऊड सिडिंग’ तसेच ‘आईसबर्ग हार्वेस्टिंग’ हे काही उपाय आहेत. मात्र कृत्रिम पाऊस किंवा हिमनगांचा वापर मोठ्या प्रमाणात करता येण्यासारखे उपाय नाहीत. त्यामुळे महासागरांच्या पाण्यातून मीठ हटवून ते पेयजल म्हणून उपलब्ध करून देण्याचाच एक शेवटचा उपाय ठरतो. समुद्राच्या पाण्यापासून मीठ वेगळे करण्याच्या अनेक दशकांपूर्वीच्या पद्धतीत थर्मल डिस्टिलेशन किंवा रिव्हर्स ओस्मोसिस मेम्ब्रेनचा वापर केला जातो. सध्या ही पद्धत जगभरात वापरली जात आहे. 170 पेक्षा अधिक देशांमध्ये वीस हजारपेक्षाही अधिक डिसॅलिनेशन प्लँट आहेत.

सर्वात मोठी दहा संयंत्रे ही सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायलमध्ये आहेत. जल, पर्यावरण आणि आरोग्य विभागाचे संयुक्त राष्ट्र युनिव्हर्सिटी संस्थानमधील डेप्युटी डायरेक्टर मंजूर कादिर यांनी सांगितले की, जगातील सुमारे 47 टक्के मीठविरहित पाणी (डिसॅलिनेटेड वॉटर) एकट्या मध्यपूर्वेत आणि उत्तर आफ्रिकेत बनवले जाते. या कोरड्या परिसरांकडे त्याच्याशिवाय अन्य पर्यायही नाही. तिथे प्रति व्यक्ती 500 घनमीटरपेक्षाही कमी पाणी पाऊस किंवा नद्यांपासून मिळते.

Back to top button