Heart attack : हार्ट अ‍ॅटॅकपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ टाळा! | पुढारी

Heart attack : हार्ट अ‍ॅटॅकपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ टाळा!

सध्याच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या काळात हृदयविकार जडलेले अनेक लोक पाहायला मिळतात. हृदयविकाराचा झटका येणे किंवा स्ट्रोकसारख्या समस्येने अनेक लोक ग्रस्त असतात. हार्ट अ‍ॅटॅक टाळण्यासाठी काही गोष्टी टाळणे गरजेचे असते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. याबाबतची ही माहिती…

मीठ : मर्यादित प्रमाणात मिठाचे सेवन हानीकारक ठरत नाही. मात्र गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मिठाचे सेवन होऊ लागले तर समस्या निर्माण होतात. यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढते. मिठामुळे पुढे लठ्ठपणाही संभवतो आणि हृदयाशी संबंधित आजार निर्माण होऊ लागतात.

प्रोसेस्ड मीट : जर प्रोटिनची गरज भागवण्यासाठी मांसाहार केला जात असेल तर त्यामध्ये नुकसानदायक काही नाही. मात्र सध्या ‘प्रोसेस्ड मीट’ म्हणजेच प्रक्रिया केलेल्या मांसाचा आहारात वापर केला जात आहे व तो हानिकारक ठरतो. त्यामध्ये मांस टिकवून ठेवण्यासाठी ‘प्रिझर्व्हेटिव्ह’चा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. त्यापासून हृदयविकार आणि कर्करोगाचाही धोका संभवतो.

साखर : गोड पदार्थ खाणे अनेकांना आवडते. मात्र मिठाप्रमाणेच साखरेचे सेवनही मर्यादेत करणे गरजेचे असते. साखर ही आरोग्याची सर्वात मोठी शत्रू ठरू शकते. गोड अधिक खाल्ल्याने लठ्ठपणाही येऊ शकतो. त्यामधून भविष्यात हृदयविकारही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मर्यादित स्वरूपातच साखरेचे सेवन करणे हितावह ठरते.

ताणतणाव : असे म्हटले जाते की, ‘चिता एकदाच जाळते आणि चिंता क्षणाक्षणाला जाळते.’ ताणतणावामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. स्ट्रेस, डिप्रेशन, टेन्शन यामुळे हृदयावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. वेळोवेळी प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होत असतात. मात्र त्यांचा स्वतःवर ताबा मिळवून न देता नीट मार्ग काढून शांत राहणे गरजेचे ठरते.

Back to top button