पृथ्वीजवळून गेला लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून गेला लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान तर अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. या पट्ट्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. आता शनिवारीही एक असाच लघुग्रह पृथ्वीजवळून गेला. त्याचे नाव ‘2023 डीझेड 2’. पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेच्या मधून तो सुरक्षितपणे पुढे निघून गेला.

हा लघुग्रह पृथ्वीपासून 1,70,000 किलोमीटर अंतरावरून गेला. तुलनात्मकरीत्या पाहिले तर चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 3,84,000 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या ‘नियर अर्थ ऑब्जेक्टस्’मध्ये अनेक लघुग्रह व धुमकेतू समाविष्ट होतात. 2015 पर्यंत अशा 1000 खगोलांचा शोध घेण्यात आला होता. शनिवारी जो लघुग्रह पृथ्वीजवळून गेला त्याला ‘सिटी किलर’ या नावानेही ओळखले जाते. त्याचा आकार 40 ते 100 मीटर इतका आहे. प्लॅनेटरी डिफेन्स ऑफिसचे रिचर्ड मोइसल यांनी सांगितले की या लघुग्रहाची खासियत म्हणजे इतक्या आकाराची वस्तू पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणे अतिशय दुर्लभ असते. या लघुग्रहाला दुर्बिणीच्या सहाय्यानेही पाहता येते.

Back to top button