मोठ्या आकाराच्या कोळ्यांच्या नव्या प्रजातीचा ऑस्ट्रेलियात शोध | पुढारी

मोठ्या आकाराच्या कोळ्यांच्या नव्या प्रजातीचा ऑस्ट्रेलियात शोध

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात ‘ट्रॅपडोर स्पायडर’ या मोठ्या आकाराच्या कोळ्यांची नवी प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती केवळ क्वीन्सलँडमध्येच आढळते. या दुर्लभ प्रजातीची मादी तब्बल वीस वर्षे जिवंत राहू शकते हे विशेष! हे कोळी पाच सेंटीमीटरपर्यंत मोठे होऊ शकतात. सामान्य ट्रॅपडोर कोळ्यांच्या तुलनेत हा आकार मोठा आहे. या प्रजातीचे नर 3 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतात. माद्यांचा आकार त्यांच्यापेक्षा मोठा असतो.

जमिनीच्या साफसफाईच्या कामांमुळे दुर्दैवाने या कोळ्यांचा बहुतांश नैसर्गिक अधिवास नष्ट झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या ही प्रजाती लुप्तप्राय बनली आहे. हे कोळी पानांच्या सहाय्याने किडे पकडण्यासाठी एक जाळे विणते. हे जाळे सर्वसामान्यपणे 1.5 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर इतके असते. कोळ्यांच्या या नव्या प्रजातीला ‘यूओप्लोस डिग्निटास’ असे नाव देण्यात आले आहे. बि—गालो बेल्टच्या अर्ध-शुष्क वुडलँडस्मध्ये ही प्रजाती शोधण्यात आली.

क्वीन्सलँडमधील वैज्ञानिकांनी सांगितले की या कोळ्याच्या नावाचा अर्थ लॅटिनमध्ये विविधता किंवा महानता याच्याशी संबंधित आहे. या कोळ्याचा प्रभावशाली आकार आणि प्रकृतीला व्यक्त करणारे हे नाव आहे. मादीच्या शरीरावर लाल-करड्या रंगाचे आवरण असते तर नराचा रंग मधासारखा असतो. त्याचे पोट करड्या रंगाचे असते. हे कोळी काळ्या मातीत घर बनवतात. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ एराक्नोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button