हत्तीणीला आवडतो फुटबॉल! | पुढारी

हत्तीणीला आवडतो फुटबॉल!

बंगळूर : हत्ती हा एक बुद्धिमान प्राणी आहे. प्रशिक्षित हत्ती अनेक प्रकारची थक्क करणारी कामे करून दाखवत असतात. थायलंडमध्ये तर हत्तीचेच हुबेहूब चित्र काढणारे हत्ती आहेत! आता भारतातील एका हत्तीणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कर्नाटकातील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरामध्ये गिरीजा ऊर्फ महालक्ष्मी नावाची 31 वर्षीय मादी हत्ती फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मंदिराला भेट देणारे भाविक अनेकदा हत्तीसोबत सेल्फी घेताना दिसतात. हे मंदिर कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात आहे.

1994 मध्ये या मादी हत्तीला कटेल येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात आणण्यात आल्याचे सांगितले जाते. या हत्तीणीला फैरोज आणि अतलाफ नावाच्या तरुणांनी प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे. मंदिराच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तीण गेल्या आठ महिन्यांपासून क्रिकेट आणि फुटबॉल खेळत आहे. त्यांनी असेही सांगितले की, हत्तीण साधारणपणे दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ फुटबॉल आणि क्रिकेट खेळते.

पूर्वी मंदिरात एक नर हत्ती होता, जो नागराज नावाने ओळखला जात असे. त्याच्या मृत्यूनंतर महालक्ष्मी या मंदिरात आली तेव्हा ती फक्त 5 वर्षांची होती. आता तिला विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वी महालक्ष्मीचा काही मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.

Back to top button