टोकियो : जपानमधील जुळ्या बहिणींनी दीर्घायुष्याबाबत विश्वविक्रम केलेला आहे. त्याची नोंद गिनिज बुकने घेतलेली आहे. उमेनो सुमियामा आणि कोइमे कोदामा अशी या जुळ्या बहिणींची नावे. ज्यावेळी त्यांच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली त्यावेळी त्यांचे वय 107 वर्षे होते.
गिनिज बुकच्या माहितीनुसार 1 सप्टेंबर 2012 मध्ये त्यांचे वय 107 वर्षे 300 दिवस होते. उमेनो आणि कोइमे यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1913 मध्ये जपानच्या शोडो आयलंडवर झाला. त्यांच्या कुटुंबात 13 सदस्य होते. या दोन्ही बहिणींच्या दीर्घायुष्याचे एक रहस्य म्हणजे त्या कधीही चिंता करीत नाहीत. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघी लग्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या.
उमेनो यांचे लग्न बेटावरीलच एका व्यक्तीशी झाले तर कोइमे यांचे लग्न बेटाबाहेरील व्यक्तीशी. दुसरे जागतिक महायुद्ध या दोघींनी जवळून अनुभवले होते. या काळात एक वेळ अशी होती की दोघी एकमेकींपासून केवळ 300 मीटर अंतरावर राहत होत्या; पण केवळ लग्नसमारंभातच भेटत असत. दोघीही सध्या एका वृद्धाश्रमात एकत्र राहतात.