वांग्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या अधिक | पुढारी

वांग्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या अधिक

नवी दिल्ली : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वांगी खूप प्रभावी आहेत. 100 ग्रॅम वांग्यात अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट 4%, प्रोटिन 1.4%, फॅटस् 0.3%, तर आहारातील फायबर 9% पर्यंत असते. याशिवाय 20% विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि 26% लोह-कॅल्शियमसह अनेक मिनरल्सदेखील असतात. विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही मानतात की कोणत्याही अन्नाला संतुलित आहार बनवण्यासाठी वांग्यातील पोषक घटकांचे मिश्रण आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे 100 ग्रॅम वांग्यात फक्त 24 kcal असते. म्हणजेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यात पोषक तत्त्वे कमी नाहीत.

वांग्याच्या सेवनाने वजन नियंत्रित ठेवता येते. कमी कार्बोहायड्रेटस् आणि जास्त फायबरमुळे वांगी मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील योग्य आहार बनतात. वांग्यावर केलेल्या संशोधनात वांगी मेंदूसाठी फायदेशीर असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. वांग्याच्या सालीमध्ये एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. जो मेंदूच्या पेशींचा क्षय रोखतो. हे त्याचे कारण आहे. वांग्यातील व्हिटॅमिन बी 6, फोलेट (बी 9), बी 5, पोटॅशियम आरोग्यासाठी तसेच पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. वांग्याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. वांग्याचे सेवन शरीराच्या सांध्यांना मदत करते व हृदयाला शक्ती मिळते. हृदयविकार आणि वात रोगात वांग्याचे सेवन फायदेशीर आहे. अग्नीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत हे वात व पित्त रोग दूर करते. वांगी हे तंतुमय पदार्थ आणि फायटोन्युट्रिएंटस्चा उत्तम स्रोत असतात. तंतुमय पदार्थांमुळे हृदयाचे व पचन संस्थेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. वांग्यातील फायटोन्युट्रिएंटस् अँटिऑक्सिडंटचे कार्य करतात. त्यामुळे कर्करोग व हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Back to top button