

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पुरातत्त्व संशोधकांनी प्राचीन काळातील एक शहर शोधून काढले आहे. या शहराला 'मोत्यांचे शहर' असे म्हटले जात होते. याचे कारण म्हणजे या शहरात मोत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असे. उत्तर भागातील शेखडोममध्ये एका बेटावर पर्शियन खाडीतील हे सर्वात जुने 'मोत्यांचे शहर' सापडले आहे. ( Pearl Town )
या शहरात नैसर्गिक मोत्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व व्यवसाय होत असे.उम्म अल-क्वैनमध्ये सिनियाह बेटावरील या शहरात अनेक कलाकृतीही सापडल्या आहेत. एकेकाळी या शहरात हजारो लोक राहत होते. हे शहर सहाव्या शतकात अस्तित्वात होते. अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये या मोत्यांच्या शहराचा उल्लेख आहे. आता त्याचा वास्तवात ठावठिकाणा सापडला आहे.
यूएई युनिव्हर्सिटीतील पुरातत्त्व विभागाचे सहायक प्राध्यापक टिमोथी पावर यांनी सांगितले की आखातीत देशांमधील मोत्यांच्या व्यवसायाशी संबंधित हे सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचे शहर आहे. व्यापाराच्या द़ृष्टिकोनातून ते सध्याच्या दुबईसारख्या शहरांचे प्राचीन पूर्वज म्हणता येऊ शकते. हे ठिकाण दुबईपासून 50 किलोमीटर ईशान्येस आहे. याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घरांचे अवशेष सापडले आहेत. ही घरे समुद्र किनार्यावरील खडक आणि चुन्यापासून बनवली होती. या घरांना मोठे अंगणही होते. ( Pearl Town )