

सिडनी : ऑस्ट्रलियाच्या आसमंतात एकेकाळी अतिशय मोठ्या आकाराचे गरूड भरार्या घेत होते. 'द लॉर्ड ऑफ रिंग्ज' या काल्पनिक कथेतील महाकाय गरूडांची आठवण यावी अशा थाटाचेच हे गरूड होते. त्यांच्या पंखांचा विस्तार तब्बल दहा फुटांचा होता. एखाद्या बुटक्या माणसालाही ते पाठीवर बसून घेऊन जाऊ शकतील इतक्या मोठ्या आकाराचे होते. अशा लुप्त झालेल्या गरूडांच्या जीवाश्मांचा शोध लागला आहे. त्यांच्या अभ्यासावरून या लुप्त प्रजातीबाबतची बरीचशी माहिती उघड झाली आहे.
या नव्या प्रजातीला 'गॅफ'चे शक्तिशाली गरूड' असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे शास्त्रीय नाव 'डायनॅटोटस गॅफी' असे आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका गुहेत 56 फूट खोलीवर त्यांचे जीवाश्म सापडले आहेत. हे जीवाश्म 1959 ते 2021 या काळात वेळोवेळी शोधण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या पंख, पाय, छातीचा पिंजरा आणि कवटीची हाडे सापडली आहेत.
त्यांचे पंजे तब्बल बारा इंच लांबीचे होते आणि पंखांचा विस्तार तीन मीटर म्हणजेच दहा फुटांचा होता असे या अवशेषांवरून दिसून आले. त्यामुळे हे पक्षी ऑस्ट्रेलियातील शिकार करणार्या पक्ष्यांपैकी आजपर्यंतचे सर्वात मोठे पक्षी ठरले आहेत. 'ओर्निथोलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले.