सर्वात महागडा तांदूळ : सौदी अरेबियाच्या वाळवंटात पिकतो; स्वादिष्ट, पोषणमूल्‍यांचा, जगभरातील श्रीमंत लोकांची मागणी | पुढारी

सर्वात महागडा तांदूळ : सौदी अरेबियाच्या वाळवंटात पिकतो; स्वादिष्ट, पोषणमूल्‍यांचा, जगभरातील श्रीमंत लोकांची मागणी

रियाध : जगभर तांदळाचे अनेक प्रकार आहेत आणि जगातील बहुतांश लोकांच्या आहारात भात असतोच. चव व सुगंधाप्रमाणे तांदळाच्या किमतीही कमी-जास्त असतात. जगातील सर्वात महागडा तांदूळ अरब देशांमध्ये पिकवला जातो. या तांदळाची किंमत एक हजार रुपये प्रतिकिलो असते. हा तांबडा तांदूळ तिकडे विशेषतः बिर्याणीसाठी वापरला जातो.

वाळवंटात पिकणारा तांदूळ चवीला अतिशय स्वादिष्ट व भरपूर पोषणमूल्यांचा असतो असे मानले जाते. जगभरातील श्रीमंत लोक असा तांदूळ मागवत असतात. या तांदळाचे उत्पादन वाळवंटातील माती व कडक उन्हात घेतले जाते. या तांदळाला ‘हसावी तांदूळ’ असे म्हटले जाते. त्याचे उत्पादन 48 अंश सेल्सिअस तापमानात घेतले जाते. याचे मूळ पूर्णवेळ पाण्यात बुडालेले असते.

सौदी अरेबियात याची शेती केली जाते. या तांदळाच्या शेतीबद्दल असे म्हटले जाते की आठवड्यातील पाच दिवस त्याला पाणी द्यावे लागते. या तांदळाच्या उत्पादनासाठी मेहनतही अधिक लागते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्याची कापणी केली जाते. त्याची किंमत 50 सौदी रियाल प्रतिकिलो आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत 1000 ते 1100 रुपये प्रतिकिलो होतेे. हसावीचा थोडा कमी दर्जाचा तांदूळ 800 रुपये किलो किमतीचा असतो.

Back to top button