‘अ‍ॅलेक्सा’ बोलणार पुरुषी आवाजात! | पुढारी

‘अ‍ॅलेक्सा’ बोलणार पुरुषी आवाजात!

न्यूयॉर्क : आधुनिक काळात असे अनेक शोध लागले ज्यामुळे लोकांच्या जीवनात बरेच बदल झाले. अशाच शोधांमध्ये ‘अ‍ॅलेक्सा’चाही समावेश आहे. अनेक कामांमध्ये हे उपकरण एखाद्या सहायकासारखी मदत करीत असते. खरे तर हे एक व्हर्च्युअल असिस्टंट आहे; पण लोक त्याच्यावर खर्‍या सहायकासारखा विश्वास ठेवतात. आतापर्यंत ‘अ‍ॅलेक्सा’मध्ये केवळ स्त्री आवाजच होता. भारतात या साधनाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. आता कंपनीने पुरुषी आवाजातही ‘अ‍ॅलेक्सा’चा वापर करण्याचा पर्याय दिला आहे. या नव्या आवाजात इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांचा वापर होऊ शकतो.

भारतातील अनेक ग्राहकांनी हे उपकरण वापरले आहे. एखादे गाणे ऐकायचे असेल, बातम्या ऐकायच्या असतील किंवा अगदी अलार्म लावणे आणि बिल पे करण्यासारखी कामेही लोक ‘अ‍ॅलेक्सा’च्या मदतीने पूर्ण करू लागली. आता या साधनाचा आवाजही बदलता येण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या डिव्हाईसवर ‘अ‍ॅलेक्सा चेंज यूवर व्हॉईस’ असे म्हटले की आवाज बदलतो! याशिवाय अ‍ॅलेक्सा अ‍ॅपमध्ये पर्सनल डिव्हाईस सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅलेक्सा सिलेक्ट करूनही हे काम करता येऊ शकेल. त्यामुळे आता अ‍ॅलेक्सा पुरुष आवाजातही बोलू शकेल.

Back to top button