

'ओपन एआय' कंपनीने आपल्या 'चॅटजीपीटी' प्रॉडक्टचे नवे अपडेटेड व्हर्जन 'जीपीटी-4' आणले आहे. हे व्हर्जन आधीच्या तुलनेत जास्त क्रिएटिव्ह, विश्वासार्ह आणि अचूक माहिती देणारे आहे.14 मार्चला लाँच झालेले हे प्रॉडक्ट कशा पद्धतीने काम करते याची ही माहिती…
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर : 'जीपीटी-4' प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर संशोधन करीत असलेल्या ओरेन एटजियोनी यांनी 'चॅटजीपीटी'च्या गेल्या व्हर्जनला आणि 'जीपीटी-4' ला एकसारखेच प्रश्न विचारले. त्यावरून असे दिसून आले की 'जीपीटी-4' हे 'जीपीटी-3.5' पेक्षा अधिक सरस आहे. ते अधिक अचूक उत्तर देते.
जेवणाबाबतही सल्ला : 'चॅटजीपीटी' किंवा 'जीपीटी-3.5' केवळ टेक्स्टची भाषा समजू शकत होते. मात्र, आता 'जीपीटी-4' टेक्स्टबरोबरच इमेजचीही भाषा समजू शकते. त्याला बनवणार्या 'ओपन एआय'चे सहसंस्थापक ग्रेग ब—ोकमॅन यांनी सांगितले की त्यांनी आपल्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या सामानाचा एक फोटो दाखवून प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना 'जीपीटी-4'ने या पदार्थांपासून जेवणासाठी कोणता खाद्यपदार्थ बनवला जाऊ शकतो हे सांगितले!
रोगावरील उपचार : युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामधील प्रा. अनिल गेही यांनी सांगितले की त्यांच्याकडे उपचारासाठी एक रुग्ण आला होता. त्यांनी या रुग्णाची समस्या सांगून 'जीपीटी-4' ला विचारले की यावर कशा पद्धतीने उपचार केला जाऊ शकतो? त्यानंतर 'जीपीटी-4'ने त्याच्यावरील उपचार व त्यासाठीचे औषधही सुचवले! औषधातील घटकांचीही 'जीपीटी-4' माहिती देऊ शकते.
रिसर्च पेपर : सध्याच्या घाईगडबडीच्या काळात अनेक लोकांकडे वाचनासाठी वेळ नसतो. अशावेळी एखादा लेख किंवा रिसर्च पेपरमध्ये काय आहे हे थोडक्यात समजावून सांगण्यासाठीही 'जीपीटी-4' उपयुक्त ठरू शकते. एका लेखाचा चुकीचा सारांश लिहून तो बरोबर आहे का हे विचारल्यावर 'जीपीटी-4'ने म्हटले की लेखातील सर्व मुद्दे लिहिण्यात आले आहेत; पण एक मुद्दा चुकीचा लिहिला आहे!
विनोदबुद्धी : जर आपण एकटेच आहात आणि कंटाळले आहात, तर अशावेळी 'जीपीटी-4' आपल्याला विनोद सांगून हसवूही शकतो. त्याचा 'सेन्स ऑफ ह्युमर' म्हणजेच विनोदबुद्धी चांगली आहे! जोक्स ऐकवण्याबाबत 'जीपीटी-3.5' च्या तुलनेत 'जीपीटी-4' अधिक सरस आहे.
परीक्षेतील प्रश्न : 'ओपन एआय' चा दावा आहे की परीक्षेत विचारल्या जाणार्या 81 टक्के प्रश्नांचे 'जीपीटी-4' अचूक उत्तर देऊ शकते. संशोधनात आढळले की अमेरिकेतील 41 राज्यांमध्ये होणार्या युनिफॉर्म बार एक्झाममध्ये विचारलेल्या 1600 प्रश्नांपैकी 1300 प्रश्नांची उत्तरे 'जीपीटी-4' ने अचूक दिली. यापूर्वी या परीक्षेत 'चॅटजीपीटी' अनुत्तीर्ण झाले होते.