फूड डिलिव्हरी करणार्‍या ड्रोनवर कावळ्याचा हल्‍ला! | पुढारी

फूड डिलिव्हरी करणार्‍या ड्रोनवर कावळ्याचा हल्‍ला!

सिडनी : पितृ पंधरवड्यात अनेक लोक कावळा येऊन नैवेद्यातील एखादी भजी तरी उचलेल म्हणून वाट पाहत असतात; पण कावळा येईलच याची गॅरेंटी नसते! मात्र एखाद्या स्टॉलवरील ताटातील भजी उचलून पलायन करणारेही कावळे असतात. असे डल्‍ला मारणारे कावळे कधी फूड डिलिव्हरी करणार्‍या ड्रोनवरही नजर ठेवतील याची आपण कल्पना करणार नाही. मात्र, असा एक प्रकार घडला आहे.
ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे बेन रॉबर्टस् नावाचे गृहस्थ ऑर्डर केलेल्या जेवणाची वाट पाहत होते.

त्यांचे हे जेवण आकाशमार्गे येत होते, म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने फूड डिलिव्हरी होणार होती. ज्यावेळी त्यांनी या ड्रोनवर कावळ्याने हल्‍ला केलेला पाहिला त्यावेळी त्यांनी ही घटना कॅमेर्‍यात कैद केली. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियात शेअर केला आणि तो लगेचच व्हायरलही झाला.

फूड डिलिव्हरी घेऊन येणार्‍या या ड्रोनवर कावळ्याने खाऊसाठी हल्‍ला केला की अन्य एखादा पक्षी म्हणून हे कळण्यास मार्ग नाही. मात्र, या हल्ल्यातून बिचारे ड्रोन कसे तरी सुटले आणि त्याने आपली ड्यूटी पूर्ण केली. ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर ते सुसाट वेगाने निघून गेले. कंपनीला मात्र या घटनेनंतर आपल्या अशा डिलिव्हरी थांबवाव्या लागल्या.

Back to top button