‘या’ गावात राहण्यासाठी मिळतात पैसे! | पुढारी

‘या’ गावात राहण्यासाठी मिळतात पैसे!

जिनिव्हा : एखाद्या सुंदर ठिकाणी आपलं एक छानसं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं; पण त्यासाठी तसा पैसाही चांगलाच लागतो. त्यामुळे असे घर सर्वांनाच परवडत नाही; पण तुम्हाला अशाच सुंदर ठिकाणी कुणी राहण्यासाठी पैसे देत असेल तर…असेच एक ठिकाण सध्या चर्चेत आले आहे. जिथे राहण्यासाठी चक्क सरकारच तुम्हाला पैसे देत आहे. एक-दोन लाख नव्हे तर तब्बल 49 लाख रुपयांची ही ऑफर आहे.

4,265 फूट उंचावर असलेले हे गाव. बर्फाळ डोंगरातील हे गाव खूपच सुंदर आहे. या गावात राहण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देत आहे. आता सरकार असं का करतं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गावात राहण्यासाठी 50,000 पौंड म्हणजे भारतीय चलनानुसार 49 लाख 26 हजारांपेक्षाही जास्त किंमत आहे. चार सदस्यांचे कुटुंब असेल तर प्रत्येक प्रौढ सदस्याला 22,440 पौंड म्हणजे 22 लाख रुपये आणि लहान मुलांना 8,975 पौंड म्हणजे 8 लाख रुपये दिले जाणार आहेत.

जर तुम्ही या गावात दहा वर्षे राहिलात तर घराची किंमत वाढेल; पण त्याआधीच ही जागा सोडली तर हीच रक्कम तुम्हाला परत द्यावी लागेल. आता हे गाव कोणतं आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. हे गाव आहे अल्बिनेन, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. वलाईस प्रांतात फ्रान्स आणि इटलीच्या सीमेवर आहे. या गावात राहण्याच्या ऑफर्ससह काही अटीही आहेत. फक्त 45 पेक्षा कमी वयोगटातील लोकांसाठीच ही ऑफर आहे. अर्ज करणारा स्विस नागरिक हवा. ज्याला परमिट सी मिळालेलं असावं.

Back to top button