अमेरिकेतील 31 टक्के लोकच घेतात पुरेशी झोप | पुढारी

अमेरिकेतील 31 टक्के लोकच घेतात पुरेशी झोप

वॉशिंग्टन : तन-मनाच्या आरोग्यासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जगात अनेक लोकांची झोप जणू काही उडालीच आहे. अर्थातच त्याचा फटका आरोग्यालाही बसत असतो. आता याबाबत अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. त्यानुसार अमेरिकेतील केवळ 31 टक्के लोकच पुरेशी झोप घेतात असे दिसून आले.

अ‍ॅपल हार्ट अँड मुमेंट स्टडीच्या डेटाचा वापर करत संशोधकांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील ब्रिघम आणि महिला रुग्णालयाने या महिन्यात प्रकाशित केलेला हा अभ्यास 42,000 हून अधिक अ‍ॅपल वॉच वापरकर्त्यांच्या झोपेच्या डेटावर आधारित आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेतील ब्रिघम आणि महिला रुग्णालयाच्या संशोधकांनी अधिक अ‍ॅपल वॉच वापरकर्त्यांच्या 29 लाखांपेक्षा जास्त रात्रीच्या झोपेचे विश्लेषण केले आहे. यात संशोधकांना जी माहिती मिळाली ती थक्क करणारी आहे. यामध्ये असे समोर आले आहे की, 31 टक्केच लोक रात्रीची कमीत कमी 7 तासांची झोप घेतात. खरेतर रिपोर्टच्या माहितीनुसार एका निरोगी प्रौढ व्यक्तीला 7 तासांची झोप आवश्यक असते.

अ‍ॅपलने 2019 मध्ये या अभ्यासाची घोषणा केली होती ज्याद्वारे संशोधकांनी अ‍ॅपल हार्ट आणि मुव्हमेंट स्टडीद्वारे डेटा गोळा केला आहे. या डेटाचा उपयोग जेव्हा संशोधकांनी केला तेव्हा त्यांना आणखी काही आकडेवारी मिळाली. ही आकडेवारी अमेरिकन लोकांची दिनचर्या दर्शवते. यातून एक अंदाज नक्की समोर येतो तो म्हणजे पण जगभरात लोकांची झोप कमी कशी होत आहे आणि त्याचा परिणाम भविष्यात त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. अभ्यासाचे विश्लेषण करताना संशोधकाना असे आढळून आले की वीक डेज म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये 66.4 लोक रात्रीच्या 12 आधी झोपायला जातात. परंतु, सुट्टीच्या दिवसांमध्ये म्हणजेच शनिवार-रविवारमध्ये ही संख्या कमी होऊन 56.6 टक्के इतकीच राहते.

वॉशिंग्टनमध्ये 7 तासांपेक्षा जास्त झोप घेणारे 38.3 टक्के लोक आहेत. तर हवाई शहरामध्ये 7 तासांपेक्षा जास्त वेळ झोपणार्‍य लोकांची संख्या खूपच कमी आहे. अभ्यासात सहभागी एकूण 42,455 लोकांच्या झोपेचे प्रमाण असे दर्शवते की प्रतिव्यक्ती सरासरी झोपेची वेळ रात्री 6 तास 27 मिनिटे इतकी होती. दुसरीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशन दररोज रात्री 7 ते 9 तास झोपण्याची शिफारस करते. यापेक्षा कमी झोप घेणार्‍यांना हृदयाशी संबंधित आजारांसह तणाव, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

Back to top button