आफ्रिकेचे दोन तुकडे होऊन नव्या महासागराचा होणार जन्म?

जोहान्सबर्ग : भूगर्भात होणार्या असंख्य हालचालींचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. हे परिणाम इतके गंभीर आहेत की हा मुद्दा फक्त जगाच्या भौगोलिक रचना बदलण्यापुरताच सीमित राहत नसून, जगाच्या किंबहुना पृथ्वीच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. सध्या आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होण्यास सुरुवात झाली असून, या घटनेतून एका महासागराचा जन्म होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘जियोफिजिकल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातून ही माहिती पुन्हा प्रकाशझोतात आली.
‘रिफ्टिंग’ म्हणजे एका ‘टेक्टॉनिक प्लेट’चे दोन किंवा त्याहून अधिक पदर मोकळे होणे. यामुळे मैदानी भागात ‘रिफ्ट व्हॅली’ तयार होते. या प्रकारच्या दर्या जमिनीसोबतच समुद्राच्या तळाशीही तयार होऊ शकतात. ही अतीव महत्त्वाची घटना साधारण 138 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिका, विभाजित होऊन दोन देशांचा जन्म झाला होता. मागील कैक हजारो वर्षांमध्ये अरेबियन पृष्ठ आफ्रिकेपासून वेगळा झाला, ज्यामुळे तांबडा समुद्र आणि ‘गल्फ ऑफ एडन’चा जन्म झाला होता. आता हा संपूर्ण प्रकार 2005 मध्ये उघडकीस आला ज्यावेळी 35 मैल दूरवर पसरलेली एक भेग इथिओपियाच्या वाळवंटी प्रदेशात पाहायला मिळाली होती.
या भौगोलिक बदलामुळे एक नवा महासागर जन्मास येऊ शकतो. ही भेग आफ्रिकन न्युबियन, आफ्रिकन सोमाली आणि अरेबियन या तीन टेक्टॉनिक प्लेटस्लगत पाहिली गेली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी हजारो वर्षांचा काळ लागणार असला तरीही ही बाब अतिशय गंभीर आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार म्हणायचे झाल्यास नवा महासागर जन्मण्यास साधारण 5 ते 10 कोटी वर्षांचा कालावधी लागू शकतो. ज्यामुळे युगांडा आणि झांबिया या देशांना त्यांचा स्वतंत्र समुद्रकिनारा लाभेल. भेग पडल्यावर दुभागलेल्या खंडातून नव्याने उदयास आलेल्या खंडात आजच्या दिवसातील सोमालिया आणि केन्याचा काही भाग, इथिओपिया आणि टांझानिया या राष्ट्रांचा समावेश असेल.