‘तो’ मासा वास्तवात होता लहान व लठ्ठ! | पुढारी

‘तो’ मासा वास्तवात होता लहान व लठ्ठ!

वॉशिंग्टन : तब्बल 36 कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर एक मासा होता. एके काळी संशोधकांना वाटत होते की हा मासा राक्षसी आकाराचा होता. त्याची लांबी किमान एखाद्या बसइतकी असावी असाही समज होता. मात्र, आता अधिक संशोधनांती असे दिसून आले आहे की हा मासा अनुमानापेक्षा निम्म्या आकाराचाच होता आणि तो जाडसरही होता!

या माशाचे वैज्ञानिक नाव ‘डंकलिओस्टेस टेरेली’ असे आहे. त्याला ‘डंकी’ या नावाने संबोधले जाते. 419 दशलक्ष ते 358 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या डेव्होनियन काळात हा मासा महासागरांमध्ये वावरत होता. एखाद्या चिलखतासारखी त्वचा असलेला हा मासा सध्याच्या ओहिओजवळ होता. त्याचे जबडे मोठे आणि तीक्ष्ण पात्यासारख्या दातांनी बनलेले होते.

150 वर्षांपूर्वी या माशाचे पहिले जीवाश्म क्लेव्हलँड शहराजवळील लेक एरीच्या काठावर सापडले होते. त्याची हाडांनी बनलेली कवटी कार्टिलेजपासून बनलेल्या सांगाड्याला जोडलेली होती. त्याची कवटी अतिशय भयावह आहे. ती तीन फुटांची असून ‘एलियन’ या चित्रपटातील पात्राची आठवण यावी अशी आहे. आता महामारीच्या काळात ओहिओतील केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील रसेल एंगेलमन यांनी त्याचा नव्याने अभ्यास केला व त्याच्या वास्तविक आकाराची माहिती स्पष्ट केली.

संबंधित बातम्या
Back to top button