बुध ग्रहाची मिळाली पहिली झलक | पुढारी

बुध ग्रहाची मिळाली पहिली झलक

बर्लिन : युरोप आणि जपानच्या एका संयुक्‍त अंतराळयानाला बुध ग्रहाची पहिली झलक कॅमेर्‍यात टिपण्यास मिळाली आहे. युरोपियन अंतराळ संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. ‘बेपीकोलंबो’ मोहिमेत ही झलक मिळाली आहे.

त्यावेळी बुध ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून अंतराळ यानाला त्याच्या कक्षेत थोडे खाली नेण्यात आले. बुधाच्या पृष्ठभागापासून सुमारे 200 किलोमीटर उंचीवरून यानाच्या कॅमेर्‍याने या बुध ग्रहाची छायाचित्रे टिपली. या ग्रहावरही चंद्राप्रमाणे अनेक खड्डे आहेत.

त्यामध्येच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या ‘लेरमोनटोव्ह क्रेटर’चा समावेश होतो. बुध हा आपल्या ग्रहमालिकेतील आकाराने सर्वात छोटा आणि सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. तो केवळ 87 दिवसांमध्ये सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.

पृथ्वीप्रमाणेच बुधही कठीण, खडकाळ पृष्ठभागाचा आहे. आपल्या चंद्राप्रमाणेच बुधाचा पृष्ठभाग अनेक विवरांनी भरलेला आहे. अब्जावधी वर्षांपासून तो भूगर्भीयद‍ृष्ट्या निष्क्रिय आहे.

Back to top button