आर्क्टिकमध्ये सापडला 48 हजार वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी’ विषाणू! | पुढारी

आर्क्टिकमध्ये सापडला 48 हजार वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी’ विषाणू!

वॉशिंग्टन : रशियाच्या सैबेरियासारख्या अतिथंड भागातील बर्फामध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांच्या देहापासून ते अनेक विषाणू-जीवाणूही आढळत असतात. आता उत्तर ध्रुव म्हणजेच आर्क्टिकमध्येही तेथील पर्माफ्रॉस्टमध्ये 48,500 वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी’ विषाणू आढळला आहे. बर्फ आणि मातीच्या अतिशय कमी तापमान असलेल्या स्तराला ‘पर्माफ्रॉस्ट’ म्हटले जाते. सध्या तापमानवाढीमुळे असे पर्माफ्रॉस्ट वितळत चालले आहेत. त्यामुळे हजारो वर्षे सुप्तावस्थेत पडलेले घातक विषाणूही जागृत होण्याचा धोका वाढला आहे.

असे विषाणू प्राणी आणि मानव अशा दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतात. वैज्ञानिकांनी आता 48,500 वर्षांपूर्वीचा असाच घातक विषाणू शोधला आहे. पर्माफ्रॉस्ट एखाद्या टाईम कॅप्सूलसारखेच असतात. त्यामध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे शव आणि विषाणू टिकून राहतात. पृथ्वीच्या अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक चौपट वेगाने गरम होत आहे. त्यामुळे तेथील पर्माफ्रॉस्टही वेगाने वितळत आहे.

‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील हवामान वैज्ञानिक किम्बर्ली मायनर यांनी सांगितले, पर्माफ्रॉस्टबाबतच्या अनेक गोष्टी वेगाने बदलत आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. पर्माफ्रॉस्टमध्ये उत्तर गोलार्धाचा पाचवा हिस्सा समाविष्ट आहे.

या बर्फामध्ये गोठलेल्या विषाणूचा छडा लावण्यासाठी फ्रान्सच्या ऐक्स-मार्सिले युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील जीनोमिक्सचे प्राध्यापक जीन मिशेल क्लेवेरी यांनी सैबेरियन पर्माफ्रॉस्टसाठी काही नमुने गोळा केले आहेत. अशा प्रकारच्या बर्फात सुप्तावस्थेत असलेल्या विषाणूला ‘झोम्बी व्हायरस’ही म्हटले जाते. 2003 मध्ये त्यांनी असा पहिला विषाणू शोधला होता. त्याच्या मोठ्या आकारामुळे त्याला ‘जायंट व्हायरस’ असे नाव दिले होते. रशियन वैज्ञानिकांनी 2012 मध्ये 30 हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू शोधला होता. त्यानंतर असे अनेक विषाणू शोधण्यात आले आहेत.

Back to top button