‘या’ माणसाजवळ आहेत 68 पेक्षाही अधिक पदव्या! | पुढारी

‘या’ माणसाजवळ आहेत 68 पेक्षाही अधिक पदव्या!

जयपूर : एका भारतीय व्यक्तीला जगातील सर्वाधिक शिक्षण घेतलेला माणूस म्हणून ओळखले जाते. या व्यक्तीचे नाव आहे दशरथ सिंह. ते भारतीय सेनेत सैनिक होते. त्यांच्याजवळ आज 68 पेक्षा जास्त पदवी आणि पदविका आहेत.

डॉ.दशरथ सिंह हे राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील खिरोड गावचे रहिवासी आहेत. त्यांचे पूर्ण नाव डॉ. दशरथ सिंह शेखावत असे आहे. डॉ. दशरथ सिंह यांनी 1988 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर ते सैनिक म्हणून भारतीय सैन्यात रूजू झाले. 16 वर्षे सैन्यात सेवा करण्यासोबतच त्यांनी पुढील शिक्षणही सुरू ठेवले. या पदव्या आणि पदविकांमुळे डॉ.दशरथ सिंह यांना भारतातील ‘मोस्ट क्वालिफाईड सोल्जर’ ही पदवी देण्यात आली आहे.

डॉ. दशरथ सिंह शेखावत यांच्याकडे सध्या 68 पेक्षा जास्त पदवी आणि पदविका आहेत. त्यांना जागतिक विद्यापीठ पदवी (युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ द वर्ल्ड) देखील प्रदान करण्यात आली आहे. तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्ने त्यांना ‘मोस्ट एज्युकेशनली क्वालिफाईड पर्सन’ हा किताब दिला आहे.

डॉ. दशरथ यांना अभ्यासाची इतकी इच्छा होती की, त्यांनी एकामागून एक मोठ्या पदव्या मिळवल्या. यामध्ये तीन विषयांतील पीएच.डी. ते सुमारे 14 विषयांत पदव्युत्तर पदवीपर्यंतचा समावेश आहे. यासोबतच डॉ. दशरथ सिंह शेखावत यांनी बी.ए., बी.कॉम., बी.ए.जी., बी.एड. आणि एल.एल.बी. सारखे अभ्यासक्रमही केले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र आणि पत्रकारिता यासारख्या क्षेत्रांचाही अभ्यास केला आहे.

Back to top button