सिम सपोर्ट असलेले पहिले इअरफोन | पुढारी

सिम सपोर्ट असलेले पहिले इअरफोन

न्यूयॉर्क : आता स्मार्टफोनची सद्दी संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सिम सपोर्ट असलेले पहिले इअरफोन आता सादर करण्यात आले आहे. त्यामुळे फोनशिवायच कॉलवर बोलता येऊ शकेल. पूर्वी वायर्ड इअरफोन लोकप्रिय होते.

आता काळाप्रमाणे नेकबँड आणि वायरलेस इअरबडस् लोकप्रिय झाले आहेत. एएनसी आणि टच कंट्रोल आदी अनेक प्रकारची वैशिष्ट्ये यामध्ये दिसतात. यावर्षी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस अर्थात ‘एमसीडब्ल्यू 2023’ मध्ये ‘मायमानू’ नावाच्या कंपनीने जगातील पहिले 4-जी कनेक्टेड वायरलेस इअरफोन सादर केले.

‘मायमानू टायटन’ असे या उत्पादनाचे नाव असून नेकबँड पॅटर्न असलेले हे वायरलेस इअरफोन आहेत. हे डिव्हाईस 37 पेक्षा जास्त भाषांमध्ये थेट भाषांतर करू शकते. यासोबतच व्हॉईस कंट्रोलही देण्यात आला आहे.

भविष्यात हे इअरफोन स्मार्टफोनला धोबीपछाड देऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. या डिव्हाईसमध्ये सक्रिय ई-सिम वापरले जाऊ शकते.

यामुळे स्मार्टफोनच्या मदतीशिवाय कॉल रिसिव्ह करता येतात आणि एसएमएसही पाठवता येतात. ‘मायमानू टायटन’ मध्ये सेल्युलर डेटाद्वारे इंटरनेट देखील चालवता येते.

भाषांतरासाठी ते ‘माय जुनो’ अ‍ॅपशी कनेक्ट करावे लागते. आवाजाद्वारे नियंत्रित करता येते. हे इअरफोन व्हॉईस अ‍ॅक्टिव्हेटेड तंत्रज्ञानाद्वारे कॉन्टॅक्ट एक्सेक मिळवू शकतात. यात गाणी देखील ऐकता येतात.

या इअरफोन्समध्ये ‘एएनसी’ सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. सुरुवातीला हे डिव्हाईस युरोप आणि अमेरिकेत विकले जाणार आहे.

Back to top button