अथेन्स ः भारताप्रमाणे ग्रीसमध्येही होळी खेळण्याची प्रथा आहे. मात्र, भारतात आपण होळी विविध प्रकारच्या रंगांद्वारे खेळतो. त्याऐवजी ग्रीसमध्ये रंग नव्हे, तर पिठाचा वापर केला जातो. याला त्या देशात फ्लोअर वॉर असे म्हटले जाते. या उत्सवाच्या वेळी तेथील लोक एकमेकांवर रंगीत पीठ फेकतात. ज्यामुळे सगळीकडे पीठच पीठ होऊन जाते. हा उत्सव राजधानी अथेन्सपासून पश्चिमेकडे 200 किलोमीटर दूर असलेल्या गॅलेक्सीडमध्ये साजरा केला जातो. हे मासेमारांचे म्हणजेच कोळ्यांचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या आहे केवळ 1700. या ठिकाणी प्रसिद्ध व्यापारी बंदर आहे.
हे फ्लोअर वॉर भारतीय होळीपेक्षा वेगळे असले, तरी तेथील लोक हा उत्सव अमाप उत्साहाने साजरा करतात. हा उत्सव ख्रिश्चन लोकांच्या 40 दिवसांची सुरुवात आणि कार्निव्हल सीझनच्या शेवटी साजरा केला जातो. कोव्हिडमुळे मागील दोन वर्षांपासून उत्सव रद्द केला गेला. त्यामुळे यंदा याचा उत्साह वेगळाच असणार आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकही दूरदूरून सहभागी होतात.
फ्लोअर वॉर ही परंपर्रा 1801 मध्ये ऑटोमन साम्राज्याच्या विरोधाचे प्रतीक म्हणून सुरू करण्यात आल्याचे सांगितले जाते.
ऑटोमन साम्राज्याने त्यावेळी ग्रीसवर राज्य केले होते आणि या कार्निव्हलला कडाडून विरोध केला होता. ग्रीसमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परंपरा जपणे याचा अर्थ सध्या चालू असलेल्या आर्थिक संकटाचा सामना करणार्या देशातील लोकांपर्यंत शांतीचा संदेश पोहोचवणे असा आहे. असे सांगितले जाते की, ऑटोमन राजाने लोकांना फ्लोअर वॉर उत्सव साजरा करण्याला बंदी घातली होती. त्यामुळे लोक संतापले होते. अखेर त्यांनी या आदेशाला विरोध करण्यासाठी वेगळीच शक्कल लढविली. त्यावेळी लोक आपल्या चेहर्यावर राखफासून रस्त्यावर नाचायला लागले होते.