तब्बल 17,524 हिरे जडवलेले विक्रमी घड्याळ | पुढारी

तब्बल 17,524 हिरे जडवलेले विक्रमी घड्याळ

मेरठ : आपल्या देशात हिर्‍यांबाबत अनेक विक्रम करण्यात आलेले आहेत. सर्वाधिक हिरे जडवलेल्या अंगठ्यांचे तर आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. कमळाच्या आकाराच्या किंवा झेंडूच्या फुलाच्या आकाराच्या अशा हिरेजडित अंगठ्या बनवल्या गेल्या होत्या. अशाच एका हिरेजडित घड्याळाचीही नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. या घड्याळामध्ये तब्बल 17,524 हिरे जडवलेले आहेत.

मेरठच्या रेनानी ज्वेलर्स यांनी हे घड्याळ बनवले आहे. ‘सर्वाधिक हिरे जडवलेले घड्याळ’ अशी त्याची गिनिज बुकमध्ये नोंद आहे. या घड्याळाला ‘श्रींकिया’ असे नाव दिले आहे. त्याचा अर्थ ‘सौभाग्याचे घड्याळ.’ या घड्याळात 17,512 सफेद हिरे आणि त्याबरोबरच बारा काळे हिरेही जडवण्यात आले आहेत. हे काळे हिरेही घड्याळाचे सौंदर्य वाढवतात. या घड्याळातील हिर्‍यांवर पाच प्रकारची पॉलिशिंग करण्यात आली आहे.

हिर्‍यांचा दर्जा ‘इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट लॅब सर्टिफिकेट’कडून प्रमाणित केलेला आहे. या घड्याळाचे वजन 373.30 ग्रॅम आहे. रेनानी ज्वेलर्सचे संस्थापक आणि सीईओ हर्षिल बन्सल यांनी म्हटले आहे की, हे घड्याळ धन आणि सौभाग्याची देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर हे घड्याळ बनले. यापूर्वी 2018 मध्ये हाँगकाँगच्या ज्वेलरने 15,858 हिरे जडवलेले घड्याळ बनवले होते. त्याचा विक्रम भारतातील या घड्याळाने मोडला.

Back to top button