‘या’ आहेत जगातील सर्वात महागड्या शाळा! | पुढारी

‘या’ आहेत जगातील सर्वात महागड्या शाळा!

जिनिव्हा : जगभरात मोठी वार्षिक फी असलेल्या अनेक शाळा आहेत. अर्थातच तिथे धनकुबेरांची मुलंच शिक्षण घेऊ शकतात. अशाच काही शाळांची ही माहिती…

स्वित्झर्लंडच्या लेसिन या डोंगराळ शहरात ‘लेसिन अमेरिकन स्कूल’ आहे. ही जगातली एक महागडी शाळा आहे. या शाळेत 340 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेची फी 1,04,000 स्वीस फ्रँक म्हणजेच सुमारे 85 लाख रुपये आहे. स्वित्झर्लंडमधील कॉलेज ‘एल्पिन ब्यू सोलेइल स्कूल’ जगातली सर्वात महागडी शाळा आहे. या शाळेत 260 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेची वार्षिक फी 1,50,000 स्वीस फ्रँक म्हणजेच सुमारे 1.23 कोटी रुपये आहे. कॉलेज एल्पिन ब्यू सोलेइलमध्ये वेगवेगळ्या 50 देशांतली मुलं शिक्षण घेत आहेत. येथे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर 4:1 असे आहे. या शाळेत फ्रेंच आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत शिक्षण दिलं जातं.

अमेरिकेतील ‘थिंक ग्लोबल स्कूल’देखील महागडी शाळा समजली जाते. या शाळेतील शिकवण्याची पद्धत विशेष प्रसिद्ध आहे. ही शाळा एक ट्रॅव्हलिंग स्कूल आहे. अशा प्रकारे येथे शिकणार्‍या 60 विद्यार्थ्यांना दरवर्षी चार देशांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. या शाळेची एकूण फी 94,050 डॉलर म्हणजेच सुमारे 70 लाख रुपये आहे. स्वित्झर्लंडमधील ‘इन्स्टिट्यूट ले’ या शाळेतलं शिक्षणदेखील सर्वसामान्य पालकांना आर्थिकद़ृष्ट्या परवडणारं नाही. या शाळेत 420 विद्यार्थी दोन भाषांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. या शाळेत 65 पेक्षा जास्त देशांमधले विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. इन्स्टिट्यूट ले शाळेची वार्षिक फी 1,25,000 स्वीस फ्रँक म्हणजेच एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Back to top button