‘स्पेस एक्स क्रू-6’ मोहिमेतून चार अंतराळवीर रवाना | पुढारी

‘स्पेस एक्स क्रू-6’ मोहिमेतून चार अंतराळवीर रवाना

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या ‘स्पेस एक्स क्रू-6’ मोहिमेचे भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजता यशस्वी लाँचिंग झाले. ‘स्पेस एक्स फाल्कन-9’ रॉकेट (ड्रॅगन एंडेवर)ने फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून यशस्वी उड्डाण केले. यामधून चार अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले.

ही एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ ची सहावी ऑपरेशनल क्रू फ्लाईट आहे. त्यामधून ‘नासा’चे दोन, रशियाचा एक आणि युएईचा एक अंतराळवीर रवाना झाला आहे. हे अंतराळवीर सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहतील. ते हृदयाच्या स्नायूच्या ऊती, मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये मानवी पेशी आणि ऊतींना प्रिंट करण्यास सक्षम असलेल्या बायोप्रिंटरची चाचणी घेतील. तसेच ड्रग मॅन्यूफॅक्चरिंग तंत्रज्ञानावरही संशोधन करतील. या मोहिमेत ‘नासा’चे अंतराळवीर स्टीफन बोवेन आणि वॉरेन वुडी होबर्ग हे दोघे जण आहेत. तसेच संयुक्त अरब अमिरातीमधील सुल्तान अल्नेयादी व रशियाचा अंतराळवीर अँड्री फेडेएव्ह हे सहभागी आहेत. अल्नेयादी हे युएईचे चौथे आणि दीर्घकाळाच्या अंतराळ मोहिमेवर जाणारे यूएईचे पहिले अंतराळवीर ठरत आहेत.

Back to top button