सातव्या वर्षांनंतर ‘या’ गावात उंची वाढतच नाही! | पुढारी

सातव्या वर्षांनंतर ‘या’ गावात उंची वाढतच नाही!

बीजिंग : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी गावं आहेत. त्यामध्ये संस्कृत बोलणार्‍या लोकांचे गाव, जुळ्यांचे गाव यापासून ते झोपाळूंच्या गावापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण गावांचा समावेश होतो. चीनमध्ये असेच एक अनोखे गाव असून, त्याला ‘बुटक्यांचे गाव’ म्हटले जाते. चीनच्या सिचुआन प्रांतात हे ‘यांगसी’ नावाचे गाव आहे, जिथे सर्व लोक बुटके आहेत. असे म्हणतात की, जन्माच्या वेळी मुले सामान्य असतात, जसजशी त्यांची वाढ होते तसतशी त्यांची उंचीही वाढते; परंतु सात वर्षांनंतर उंची वाढणे थांबते. तसे, काही मुलांची लांबी 10 वर्षांपर्यंत वाढते. परंतु, त्यापैकी बहुतेकांची उंची 7 वर्षांनंतर वाढणे बंद होते.

हे गाव केवळ चीनसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक रहस्य आहे. शास्त्रज्ञांनीही इथे खूप संशोधन केले; पण त्यामागचे कारण कोणालाच कळू शकले नाही की, इथे काय आहे? ज्यामुळे माणसांची उंची वाढत नाही. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती, इथले अन्न, पाणी यांसह अनेक गोष्टींचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला आहे; पण इथल्या लोकांची उंची का वाढत नाही हे कळू शकले नाही. या गावातील अर्ध्याहून अधिक लोक बुटके आहेत. अनेकदा येथे फक्त 2 ते 3 फूट उंचीचे लोक दिसतात. माणसे बुटकी असण्यामागे येथील लोकांचे अनेक तर्कवितर्क आहेत.

काही लोक म्हणतात की, हे गाव शापित आहे; तर काही लोक म्हणतात की, काही दशकांपूर्वी आलेल्या एका आजाराने इथल्या सर्व लोकांना वेढले होते, त्यामुळे इथल्या लोकांची उंची वाढत नाही. या गावातील जमिनीत पारा धातूचे प्रमाण जास्त असल्याचे येथे संशोधन करणार्‍या काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यात तयार झालेले धान्य खाल्ल्याने माणसांची उंची वाढत नाही. याशिवाय काही शास्त्रज्ञ सांगतात की, बर्‍याच वर्षांपूर्वी जपानने येथे विषारी वायू सोडला होता, ज्यामुळे येथील लोक बुटकी होतात.

Back to top button