मोबाईल पाहताच ‘तिला’ येते चक्कर! | पुढारी

मोबाईल पाहताच ‘तिला’ येते चक्कर!

लिस्बन : अनेकांची सकाळ ‘प्रभाते करदर्शनम्’च्या चालीवर ‘प्रभाते मोबाईल दर्शनम्’ अशी होत असते आणि रात्री झोपतानाही मोबाईलवर नजर टाकूनच डोळे मिटले जातात! दिवसभरात किती वेळा मोबाईल चेक केला जातो, ते ज्याचे त्याला माहिती असतेच! अशा स्थितीत कुणाला मोबाईल पाहिल्यावर त्रास होत असेल याची आपण कल्पनाही करणार नाही. मात्र मोबाईल वापराचा अतिरेक केलेल्या एका महिलेमध्येच हा त्रास उद्भवला आहे! तिला मोबाईल पाहताच चक्कर येते आणि चक्क उलटीही होते!

पोर्तुगालमधील हे प्रकरण आहे. फेनेला फॉक्स असे या महिलेचे नाव. ती एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. 29 वर्षांची फेनेला हिला मोबाईलचं इतकं व्यसन होतं की, दिवसभरातील 14 तास ती मोबाईलवर असायची. त्यानंतर तिला काही समस्या जाणवू लागली. ती म्हणाली, 2021 सालच्या सुरुवातीला तिच्या डोक्यात आणि मानेत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर चक्कर येऊ लागली, उलट्या येणंही सुरू झालं. तिला नीट चालताही येत नव्हतं.

आपल्याला नेमकं काय झालं आहे जाणून घेण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली; पण डॉक्टरांनाही तिच्या आजाराचं निदान करता आलं नाही. जेव्हा तिची तब्येत खूप बिघडली, तेव्हा तिनं ब्रिटनमध्ये आपल्या आई-वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, एअरपोर्टवर पोहोचल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. समस्या इतकी वाढली की, मला व्हिलचेअरची मदत घ्यावी लागली. ब्रिटनमधील डॉक्टरांनाही समजलं नाही की, तिला नक्की काय झालं आहे.

मोबाईलने फेनेलाला अक्षरशः अपंग करून ठेवलं. फेनेलाच्या वडिलांनी एकदा सायबर सिकनेसबाबत वाचलं. आपल्या मुलीमधील लक्षणं पाहून ती सायबर सिकनेसची शिकार झाल्याचं त्यांना समजलं. तिला डिजिटल व्हर्टिगो झाला होता. दुर्दैवाने फेनेला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पैसे कमवते. ती सांगते, आता ती आपला फोन पुन: पुन्हा पाहत नाही कारण यामुळे तिची सायबर सिकनेसची लक्षणं पुन्हा दिसू लागतात.

Back to top button