अंटार्क्टिकाजवळ दिसली महाकाय जेलीफिश | पुढारी

अंटार्क्टिकाजवळ दिसली महाकाय जेलीफिश

वॉशिंग्टन : अतिशय मोठ्या आकाराच्या फँटम जेलीफिशला पाहणे हा एक दुर्मीळ अनुभव असतो. आता खोल समुद्रात वावरणारी व ‘यूफो’ म्हणजेच ‘उडत्या तबकडी’सारखी दिसणारी ही जेलीफिश अंटार्क्टिकाच्या तटाजवळ आढळून आली आहे. या जेलीफिशच्या ‘तबकडी’खाली मोठ्या व जाड पट्ट्या तरंगत असतात.

खोल समुद्रात राहणार्‍या सर्वात मोठ्या आकाराच्या अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जायंट फँटम जेलीफिशचा समावेश होतो. तिचे शास्त्रीय नाव ‘स्टिजियोमेड्युसा गिगँटिया’ असे आहे. क्रूज लाईन ऑपरेटर ‘वायकिंग’कडून प्रवाशांसाठी समुद्रात सोडलेल्या एका पाणबुडीमुळे हा जलचर आढळून आला. ही जेलीफिश 16 फुटांपेक्षाही अधिक लांबीची होती. तिची रिबन ताणवली तर ही लांबी 33 फुटांचीही असू शकते.

‘पोलर रिसर्च’ नावाच्या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पाणबुडीतील प्रवाशांनी या जेलीफिशचे काही फोटो टिपले. ते पाहिल्यावर संशोधक डॅनिएल मूर यांनी ही फँटम जेलीफिश असल्याचे ओळखले. मूर हे ‘वायकिंग’चे मुख्य संशोधकही आहेत. ही जेलीफिश आर्क्टिक वगळता अन्य सर्व महासागरांमध्ये आढळते. अतिशय खोलवर तिचे अस्तित्व असल्याने सहसा ती मनुष्याच्या नजरेस पडत नाही.

Back to top button