लकी ड्रॉमध्ये मिळाली एक कोटची कार; पण... | पुढारी

लकी ड्रॉमध्ये मिळाली एक कोटची कार; पण...

लंडन : कधी कधी ‘दैव देते आणि कर्म नेते’ असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. स्कॉटलंडच्या फाल्किर्कमध्ये राहणार्‍या 24 वर्षीय ग्रँट बर्नेट या तरुणाबाबतही असेच घडले. क्लिक कॉम्पिटिशन नावाच्या लकी ड्रॉ फर्मकडून त्याने 10,000 रुपयांचे तिकीट खरेदी केले. गेल्या 14 जानेवारी रोजी लकी ड्रॉ जिंकल्यानंतर त्याला कार मिळाली आणि त्याने आनंदही साजरा केला; पण या कारचे सुख काही त्याला फार काळ लाभले नाही!

या तरुणाला लकी ड्रॉमध्ये दोन पर्याय देण्यात आले होते. एकतर तो एक कोटी रुपये रोख घेऊ शकतो किंवा त्या रकमेची कार खरेदी करू शकतो. त्याने एक आकर्षक आणि आलिशान कार घेण्याचा निर्णय घेतला.

लक्झरी कार मिळाल्याने त्याला अतिशय आनंद झाला; पण रस्ता अपघातामुळे त्याच्या आनंदावर विरजण पडले. अपघातात त्याला काहीही झाले नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले. सोशल मीडियावर त्याला ट्रोलही करण्यात आले; पण त्यानंतर ग्रँटने स्पष्टीकरण दिले की, ही आपली चूक नसून एका पशूची कारला धडक बसली, त्यामुळेच असा अपघात झाला. त्याने फेसबुकवर गाडीची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला; पण लोक म्हणतात की ग्रँट फक्त मागील भाग दाखवत आहे ज्यात तोडफोड कमी आहे, समोरच्या भागात जास्त आहे.

Back to top button