‘दिल शेप’ वेफर खाल्ला, गमावले एक कोटी! | पुढारी

‘दिल शेप’ वेफर खाल्ला, गमावले एक कोटी!

लंडन : ब्रिटनमध्ये राहणार्‍या एका महिलेला नशिबाने धोका दिला. या महिलेची एक कोटी रुपये जिंकण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली. या महिलेने स्नॅक्स पाकिटात सापडलेला हार्ट शेप वेफर्स खाल्ला; पण यानंतर तिला कळले त्या हार्टशेप वेफर्सची किंमत तब्बल एक कोटी रुपये इतकी होती!

या महिलेने स्नॅकचे एक पाकीट विकत घेतले होते. या पाकिटात महिलेला हार्टशेफ वेफर सापडला; पण हा एक वेफर 1 कोटी रुपये जिंकून देईल याचा अंदाज महिलेला नव्हता. पण जेव्हा याबाबत तिला कळलं तेव्हा तिच्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरलं नव्हतं. या महिलेचे नाव डॉन सॅगर असे असून ती 40 वर्षांची आहे.

ती ब्रिटनमधल्या एका सुपरमार्केटमध्ये काम करते. 15 फेब्रुवारीला सॅगर नेहमीप्रमाणे आपल्या कामावर आली यावेळी तिने आपल्या दोन मुलांनाही आणले होते. मुलांसाठी सॅगरने ‘रेड सॉल्टेड’ नावाच्या वेफर्सची तीन पाकिटे विकत घेतली. यातल्या एका पाकिटातून सॅगर वेफर्स खात असताना नेहमीपेक्षा वेगळा शेप असलेला वेफर्स तिच्या हाती लागला. या वेफरचा आकार बदामासारखा (हार्ट शेप) होता.

सहज म्हणून सॅगरने त्या हार्टशेप वेफर्सचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर वार्‍यासारखा पसरला. यावेळी तिला काही लोकांनी याबाबतची माहिती दिली. ‘रेड सॉल्टेड’ चिप्स बनवणार्‍या वॉकर्स कंपनीने हार्टशेप वेफर्स आणून देणार्‍या ग्राहकाला 99 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. सॅगरला जेव्हा याबाबतची माहिती मिळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हार्टशेप वेफर्सचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानेतर सॅगरने तो वेफर्स खाऊन टाकला होता!

Back to top button