सावधान..! नवा उपग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय | पुढारी

सावधान..! नवा उपग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय

वॉशिंग्टन : ठरावीक काळानंतर आपल्या पृथ्वीच्या निकट येणारे अनेक उपग्रह अंतराळात अस्तित्वात आहेत. यातीह बहुतांश उपग्रह निरुपद्रवी आहेत. म्हणजेच त्यांच्यामुळे वसुंधरेला कोणताही धोका उत्पन्न होत नाही. मात्र, आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने एका उपग्रहाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. जर पृथ्वी आणि हा उपग्रह यांच्यातील अंतर 80 लाख किमीपेक्षा कमी झाले, तर त्यामुळे पृथ्वीला धोका संभवतो. नजीकच्या काळात एकूण सहा उपग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत. तथापि, त्यातील एकाही उपग्रहामुळे कसलाच धोका निर्माण होणार नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण परिघात आल्यानंतर या उपग्रहांची दिशा बदलू शकते.

तथापि, अस्ट्रॉईड 2023 सी वाय 1 या नावाचा उपग्रह पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो, असे ‘नासा’ने म्हटले आहे. तूर्त हा उपग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर लवकरच आणखी कमी होण्याची शक्यता ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे कारण तो पृथ्वीच्या दिशेने येऊ लागला आहे. त्याचा वेग आहे प्रतितास 23967 किमी.

हा उपग्रह अपोलो समूहाशी संबंधित आहे. पृथ्वीच्या जवळ असणार्‍या उपग्रहांच्या तारकापुंजाचे नामकरण 1930 साली अपोलो समूह असे करण्यात आले आहे. त्याचा शोध जर्मनीचे खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेनमुथ यांनी लावला होता.

हे उपग्रह लोह आणि निकेलसारख्या धातूंपासून तयार होतात. ते प्रामुख्याने गुरू आणि मंगळ या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत दिसून येतात. उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रामुख्याने सूर्यमालेच्या निर्मितीमागील घटनांचा मागोवा घेतात. सूर्यमालेतील रहस्यमय घटनांचा शोध घेण्यासाठी ‘नासा’च्या शक्तिशाली दुर्बिणी कायम सज्ज असतात. त्यावर या घटनांची नोंदही केली जाते. ‘नासा’ने केलेल्या संशोधनानुसार हा नवा उपग्रह 50 फूट रुंद आणि 111 फूट लांब आहे. त्याचा आकार एखाद्या अंड्यासारखा दिसत असल्याचे निरीक्षणही शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. मात्र, तो नेमका कधी पृथ्वीच्या जवळ येणार यावर सध्या ‘नासा’चा अभ्यास सुरू आहे.

Back to top button