काय सांगता, ‘या’ देशांना स्वतःचा विमानतळच नाही | पुढारी

काय सांगता, ‘या’ देशांना स्वतःचा विमानतळच नाही

लंडन ः जलद वाहतुकीच्या साधनांनी जग एकमेकांच्या जवळ येत आहे. जगाला आता वैश्विक खेडे म्हणजेच ग्लोबल व्हिलेज मानले जात आहे. जलद वाहतुकीसाठी रेल्वे, सेमी फास्ट ट्रेन, बुलेट ट्रेन आणि पुढे जाऊन हायपर लूपसारख्या साधनांचा शोध लावला जात आहे. मात्र, जागतिक पातळीवर एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी आजही विमानसेवेला पर्याय नाही. जगात असेही काही देश आहेत, ज्यांच्याकडे स्वत:चा विमानतळ नाही. मग ते देश काय करतात, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. याचे उत्तर म्हणजे संबंधित देशांतील लोक विमान पकडायला दुसर्‍या देशात जातात. स्वत:चा विमानतळ नसलेल्या देशांची संख्या आहे चार. या देशातील लोक रस्ते किंवा जलमार्गाने शेजारील देशात जाऊन विमान पकडतात.

लिंचेस्टाईन ः लिंचेस्टाईन या युरोपातील छोट्या देशाकडे स्वत:चा विमानतळ नाही. हा देश सर्वात छोट्या देशांपैकी एक असून तो अवघ्या 75 किमी क्षेत्रात पसरला आहे. या देशातून आपल्याला कुठे विमानाने जायचे असेल, तर शेजारील स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या झुरीच विमानतळावर जाऊन विमान पकडावे लागते.

व्हॅटिकन सिटी ः व्हॅटिकन सिटी हा इटुकला देश ख्रिस्ती लोकांची पंढरी मानला जातो. इटलीची राजधानी रोममध्ये सुमारे 109 एकरांवर तो वसला आहे. त्यामुळे व्हॅटिकन सिटीला स्वतःचा विमानतळ नाही. तेथील लोक रोममधील विमानतळाचा वापर प्रवासासाठी करतात.

सॅन मारिनो ः सॅन मारिनो हा इटलीपासून जवळ असलेला असा छोटा देश आहे की, त्याच्याकडे स्वत:चा विमानतळ नाही. त्याचे क्षेत्रफळ अवघे 61 किमी आहे. या देशात जाण्यासाठी किंवा तेथून विमानाने दुसरीकडे जाण्यासाठी शेजारील इटलीमधील रिमिनी विमानतळावर पोहचावे लागते.

मोनॅको ः मोनॅको हा युरोपातील अत्यंत संपन्न पण छोटासा देश होय. देशाची लोकसंख्या आहे सुमारे 36 हजार. तिथले लोक अफाट श्रीमंत असले तरी तिथे विमानतळ नाही. मोनॅको देश तिन्ही बाजूंनी फ्रान्सने वेढलेला आहे. जर तुम्हाला विमानाने मोनॅकोला जायचे असेल, तर फ्रान्सच्या नाइस कोट विमानतळावर उतरावे लागते. त्यानंतर रस्ते किंवा जलमार्गाचा वापर करावा लागतो.

Back to top button