कपडेसुद्धा तुमच्या मूडवर करतात परिणाम | पुढारी

कपडेसुद्धा तुमच्या मूडवर करतात परिणाम

नवी दिल्ली : आपल्या कपड्यांबाबत बहुतांश जण अतिशय दक्ष असतात. विशेषत: मुली स्वतःच्या कपड्यांबाबत फारच कॉन्शियस असतात कारण यामुळे आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत होते. चारचौघांत आपले वेगळेपण त्यातून उठून दिसते. तुम्हाला कधी कोणतेही कपडे परिधान करताना आत्मविश्वास वाटला आहे किंवा तुम्ही कधी स्वत:ला इतरांपेक्षा कमी छान दिसता, असे कधी तुम्हाला वाटले आहे का? अर्थात, कधी ना कधी आपल्या कपड्यांमुळे आपल्या सर्वांनाच या समस्यांचा सामना करावा लागला आहे. कधी कधी आपल्याला खूप आत्मविश्वासही वाटला आहे. म्हणजेच आपला मूड आणि व्यक्तिमत्त्व अशा दोहोंवर कपड्यांचा परिणाम होतो, यात शंका नाही.

आपण घातलेले कपडे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि वागणुकीबद्दल बरेच काही सांगून जातात. म्हणूनच आपले कपडे निवडताना केवळ ड्रेसिंग स्टाईलच नाही, तर सर्व महत्त्वाच्या गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे. योग्य कपड्यांमुळे तुमचा मूड तर चांगला राहतोच, शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

– जेव्हा आपण आरामदायक कपडे घालतो तेव्हा आपल्याला अधिक चांगले वाटते. साहजिकच आत्मविश्वासाची पातळी आपोआप वाढते आणि मूडदेखील चांगला राहतो.

– वैयक्तिक स्टाईल वाढवणारे कपडेदेखील तुम्हाला छान वाटतात. अशा कपड्यांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. शिवाय तुम्हाला आरामदायी वाटते. जेव्हा आपल्याला असे वाटू लागते की, आपण चांगले दिसत आहोत, तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो.

– एखाद्या खास प्रसंगानुसार कपडे परिधान केल्यानेही तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जसे की, मुलाखतीदरम्यान आपल्याला अनेकदा भीती वाटते. मात्र, जेव्हा आपण आपल्या कपड्यांवर कॉन्फिडंट असतो तेव्हा त्याचा परिणाम नकळतपणे तुमच्या मुलाखतीवरही चांगला होतो.

– कपड्यांचा रंगदेखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश टाकतो. वेगवेगळ्या रंगांनुसार वेगवेगळे भाव जागृत होत असतात. जसे की, पिवळा रंग घातल्यावर फ्रेश वाटते. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे.

एकूणच, कपडे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम करतात. त्यामुळे नेहमी ठिकाण आणि परिस्थितीनुसार कपडे निवडणे नेहमीच श्रेयस्कर ठरते.

Back to top button