‘बिग बँग’ नंतर बनलेल्या सहा आकाशगंगांचा शोध | पुढारी

‘बिग बँग’ नंतर बनलेल्या सहा आकाशगंगांचा शोध

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने ‘बिग बँग’ नंतर विकसित झालेल्या सहा आकाशगंगांचा शोध लावला आहे. ज्या महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली असे मानले जाते त्याला ‘बिग बँग’ असे नाव दिलेले आहे. त्याच्यानंतर अवघ्या 50 कोटी वर्षांनंतर आकाराला आलेल्या या सहा आकाशगंगा असून ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील असल्याने त्यांचे वेगळे महत्त्व आहे.

या सहाही आकाशगंगा आकाराने मोठ्या असून त्यांच्यामध्ये आपल्या ‘मिल्की वे’ इतकेच तारे आहेत. ‘बिग बँग’नंतर 500 ते 700 दशलक्ष वर्षांनंतर या आकाशगंगा बनल्या असे मानले जात आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बौल्डरमधील एरिका नेल्सन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ‘बिग बँग’ नंतर इतक्या कमी वेळेत व मोठ्या वेगाने आकाशगंगा बनल्या होत्या याची अनेकांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र, या सहा आकाशगंगा त्याचा प्रत्यक्ष पुरावा ठरल्या आहेत. ही प्रक्रिया अतिशय संथगतीने झाली असावी अशीच पूर्वीची धारणा होती. ‘बिग बँग’नंतर एक ते दोन अब्ज वर्षांनी छोट्या आकाशगंगा निर्माण झाल्या असाव्यात असे सध्या मानले जाते. मात्र, या आकाशगंगा केवळ 50 कोटी वर्षांमध्येच बनल्या व त्यांचा आकारही मोठाच आहेे हे विशेष!

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करून 13.5 अब्ज वर्षांपूर्वीच्या काळात डोकावून पाहण्यात आल्यावर या सहा आकाशगंगांचा छडा लागला. अवकाशाच्या पोकळीतून प्रकाश विशिष्ट गतीनेच प्रवास करीत असतो. त्यामुळे ब्रह्मांडात आपण जितके खोलवर जाऊ तितका जुन्या काळातील प्रकाश समोर येतो व त्यामधून त्या काळातील माहिती दिसून येते. ज्यावेळी ब्रह्मांडाचे वय सध्याच्या वयाच्या केवळ 3 टक्केच होते त्या काळातील या आकाशगंगा आहेत.

Back to top button