सर्वात एकाकी घर? | पुढारी

सर्वात एकाकी घर?

लंडन : छायाचित्रात दिसणारे हे घर पाहिल्यावर अनेकांना ‘होम अलोन’ नव्हे तर ‘अलोन होम’ असेच वाटेल! एका निर्जन बेटावर एकाकी असणार्‍या या घराचे फोटो सोशल मीडियातही प्रसिद्ध आहेत. त्याबाबत अनेकांना कुतुहलही असते. हे घर कुणी बांधले व ते कोणत्या बेटावर आहे याचीही अनेकांना माहिती हवी असते.

समुद्रातील एका हिरव्यागार बेटावरील डोंगरउतारावर हे सफेद रंगाचे घर दिसून येते. त्याला अनेकांनी ‘जगातील सर्वात एकाकी घर’ असे संबोधले आहे. अर्थात या ‘घराची’ वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. हे ‘घर’नसून एक ‘केबिन’ आहे. आईसलँडच्या दक्षिणेला असलेल्या एलिडे नावाच्या बेटावर पक्ष्यांची शिकार करण्यासाठी येणार्‍या लोकांच्या सोयीसाठी ती उभी केलेली आहे. याठिकाणी पंधरा ते 18 छोट्या बेटांचा ‘वेस्टमॅनेजर’ नावाचा समूह आहे. या समूहामध्येच या ‘एलिडे’ बेटाचा समावेश होतो.

सध्या हे बेट पूर्णपणे निर्जन असले तरी एके काळी या बेटावर पाच कुटुंबे राहत होती. 1930 च्या दशकात या लोकांनी हे बेट सोडले व ते निर्जन बनले. आता जे घर या बेटावर दिसत आहे ते एलिडे हंटिंग असोसिएशनने 1950 च्या दशकात उभे केलेले आहे. त्याचा वापर एक ‘हंटिंग केबिन’ म्हणून केला जातो. या संस्थेचे सदस्य बेटावर पफिन पक्ष्यांची शिकार करण्यासाठी येत होते व त्यांच्यासाठी ही केबिन बांधण्यात आली होती.

Back to top button