हम्पबॅक व्हेलचे गाणे झाले कमी! | पुढारी

हम्पबॅक व्हेलचे गाणे झाले कमी!

सिडनी : पूर्व ऑस्ट्रेलियातील हम्पबॅक व्हेलच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये सुधारणा झाली आहे. नव्या शोधात दिसून आले की नर व्हेल मादीशी जवळीक साधण्यासाठी अधिक प्रभावी पद्धतीने काम करीत आहेत. मात्र, व्हेलची संख्या वाढत असतानाच एक नवी बाब समोर आली आहे. नर हम्पबॅक व्हेलचे गाणे कमी आणि एकमेकांशी झुंज अधिक होत आहे.

ऑस्ट्रेलियन हम्पबॅक व्हेलना ‘मेगाप्टेरा नोवाएंग्लिया’ असे शास्त्रीय नाव आहे. त्यांच्याविषयीच्या 1997 पासून 2015 पर्यंतच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यामधून ही बाब समोर आली. त्याची माहिती ‘कम्युनिकेशन बायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीलगत या माशांची संख्या 1960 च्या दशकात 500 पेक्षाही कमी होती. मात्र, आता ती किमान 30 हजार झाली आहे. त्यांची लोकसंख्या चांगल्याप्रकारे वाढली असली तरी मादीसाठी होणारा झगडाही वाढल्याचे दिसून आले आहे.

नर व्हेल मादीला आकर्षित करण्यासाठी गायनही करतात. मात्र, या माशांची संख्या जशी जशी वाढत गेली तसे नर व्हेल पूर्वीइतके गात नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी ते गुपचूप मादीला शोधण्यात आणि अन्य नराशी झगडण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. गायन करणार्‍या नर व्हेलचे प्रमाण 2003-04 मध्ये दहापैकी दोन होते तर 2014-15 मध्ये ते आणखी घटून दहापैकी एक इतके झाले.

Back to top button