काजूचे दूध ठरते आरोग्यदायी! | पुढारी

काजूचे दूध ठरते आरोग्यदायी!

नवी दिल्ली : सध्या पारंपरिक दुधालाही अनेक पर्याय शोधले जात आहेत. त्याचे कारण म्हणजे जगात वाढत चाललेली ‘वेगन’ लोकांची संख्या. ‘वेगन’ आहार घेणारे हे लोक कोणताही पशुजन्य आहार घेत नाहीत व त्यामध्ये अगदी दुधाचाही समावेश असतो. त्याऐवजी सोया मिल्कसारख्या पर्यायांचा वापर केला जातो. काजूचेही दूध बनवले जाऊ शकते व ते केवळ ‘वेगन’ लोकांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते. काजू आणि पाणी मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घेतले की, काजूचे दूध बनते. ब्लेंड केल्यानंतर मिळणारे द्रव म्हणजे काजूचे दूध. ते जाड, पांढरे आणि खूप मलईदार असते. जर तुम्ही शाकाहारी किंवा लैक्टोज असहिष्णू असाल तर म्हशीच्या किंवा गायीच्या दुधाऐवजी काजूचे दूध पिऊ शकता. त्यामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण खूप कमी असते. हे नॉन-डेअरी आणि लो-कॅलरी असलेले दूध आहे.

काजूच्या दुधात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते. जे हृदय निरोगी ठेवते. काजूचे दूध पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉल नसते. ज्यांची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे, तेही याचे सेवन करू शकतात. काजू रक्तदाबाची पातळी कमी करते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही काजू फायदेशीर आहे. याशिवाय एलडीएल आणि टोटल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. काजूचे दूध प्यायल्यास वजन कमी होऊ शकते.

या दुधामध्ये अ‍ॅनाकार्डिक अ‍ॅसिड नावाचे बायोटॅक्टिक कंपाऊंड असते, जे शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे वजन वाढत नाही. तसेच गाय आणि बदामाच्या दुधाच्या तुलनेत त्यात कॅलरीज कमी असतात. वजन कमी करण्यासाठी काजूचे दूध हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. काजूमध्ये अ‍ॅनाकार्डिक अ‍ॅसिड, कार्डेनॉल्स, कार्डल्स, बोरॉन यासारखे विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट संयुगे असतात, जे शरीरातील कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. काजू किंवा काजूचे दूध प्यायल्याने कर्करोग होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते.

काजूच्या दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी असते. जे हाडे निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. व्हिटॅमिन डी फॉस्फरस, कॅल्शियम शोषून घेण्याचे कार्य करते. ज्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी राहतात. या दुधाच्या सेवनाने शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणार्‍या आजारांपासूनही बचाव होतो. काजूमध्ये भरपूर लोह असल्याने काजू खाल्ल्याने किंवा त्याचे दूध प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. ज्यांना अ‍ॅनिमियाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम पेय आहे.

Back to top button