हवेच्या प्रदूषणामुळे वाढले मुदतपूर्व प्रसूतीचे प्रमाण | पुढारी

हवेच्या प्रदूषणामुळे वाढले मुदतपूर्व प्रसूतीचे प्रमाण

वॉशिंग्टन ः हवेच्या प्रदूषणाचा परिणाम मुदतपूर्व प्रसूती वरही पडला आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील बाळावर होणार्‍या अशा परिणामावर आता नवे संशोधन झाले आहे. 2019 मध्ये या कारणामुळे 60 लाख बाळांचा मुदतीपूर्वीच जन्म झाला असल्याचे दिसून आले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले.

संशोधकांनी म्हटले आहे की त्यांनी 204 देशांमधील आकडेवारीचा या संशोधनासाठी वापर केला. विषारी हवेतील प्रदूषणासाठी जबाबदार ‘पीएम 2.5’ गरोदरपणाच्या काळात महिलांवर दुष्परिणाम करतो. ‘पीएम 2.5’ हे अतिशय बारीक कण असतात जे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. हवेच्या प्रदूषणासाठी केवळ ट्रॅफिक आणि पॉवर प्लँटस्मधून निघणारा धूर व वायूच जबाबदार असतात असे नाही तर इनडोअर पोल्यूशन म्हणजे घरातील अंतर्गत प्रदूषणही जबाबदार असते. घर आणि बाहेरच्या हवेच्या प्रदूषणाचा गर्भवती महिलांवर कोणता परिणाम होत आहे हे तपासले गेले. संशोधकांचे म्हणणे आहे की जर हवेचे प्रदूषण घटवण्यात यश आले तर स्थिती बरीच सुधारू शकते. आग्‍नेय आशिया आणि सब-सहारा आफ्रिकेतील मुदतीपूर्वीच जन्मणार्‍या मुलांची प्रकरणे 78 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतील. अशा मुलांचे वजनही अतिशय कमी असते.

Back to top button