गर्भवती असताना एक ग्लास वाईनही ठरते धोकादायक | पुढारी

गर्भवती असताना एक ग्लास वाईनही ठरते धोकादायक

अ‍ॅम्स्टरडॅम : जगभरातील आरोग्य तज्ज्ञ गर्भवती महिलांना अल्कोहोलपासून दूरच राहण्याचा सल्ला देत असतात. मद्यपानामुळे गर्भातील बाळावर विपरित परिणाम होत असतो. आता याबाबत नेदरलँडस्च्या इरासमस मेडिकल सेंटरमधील वैज्ञानिकांनी नवे संशोधन केले आहे. त्यांना आढळले की आठवड्यातून केवळ एक ग्लास वाईन पिल्यानेही गर्भातील बाळाच्या चेहर्‍यामध्ये कायमचे बदल घडू शकतात.

या संशोधनासाठी 5,600 शाळकरी मुलांच्या चेहर्‍याची 200 तज्ज्ञांनी तपासणी केली. त्यासाठी थ—ी-डी इमेजिंग व डीप लर्निंग अ‍ॅल्गॉरिदमचा वापर करण्यात आला. या मुलांपैकी काही मुलांच्या मातांनी गर्भधारणेच्या काळात अल्कोहोलचे सेवन केले होते, तर काही मुलांच्या मातांनी अल्कोहोल टाळले होते. आठवड्यातून केवळ 12 ग्रॅम अल्कोहोलचे सेवन केल्यानेही मुलांच्या चेहर्‍यात कायमस्वरूपी बदल घडतो असे या पाहणीतून दिसून आले.

या बदलांमध्ये छोटे नाक, डोळ्यांखाली सखल भाग आणि हनुवटी बाहेर येण्यासारख्या बदलांचा समावेश आहे. गर्भवती महिला अल्कोहोलचे सेवन जितके अधिक करते तितके हे बदल अधिक खोलवर होत असतात. गर्भधारणेच्या काळात आणि त्यापूर्वी तीन महिन्यांपासून ज्या महिला अल्कोहोलचे सेवन करीत असतात त्यांच्या मुलांबाबत असे घडत असते. गर्भधारणेच्या काळात अल्कोहोलच्या सेवनाने मुलांना फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर होण्याचाही धोका असतो. ते मानसिक रूपानेही कमजोर होऊ शकतात.

Back to top button